Photo Credit Team Navrashtra
मुंबई : नुकताच राज्यसरकारने शासनआदेश जाहीर केला आहे. सर्व योजनांसाठी २७० हजार कोटी सरकार पुढच्या दोन महिन्यात खर्च करणार आहे. ही शासकीय योजनांची विशेष प्रसिद्धी मोहिम आहे असं दिसत नाही, ही निवडणुकीसाठी प्रसिद्धी आहे. आपला स्वत:चा प्रचार करण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर करण्याचा सरकारचा कार्यक्रम दिसतोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे.
राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे-फडणवीस- पवार सरकारने ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ राबवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या योजनेसाठी तब्बल 270 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे या मोहिमेसाठी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलेल्या अंदाजित खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने मान्यता दिली. या योजनेवरुन विरोधकांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांनीही या योजनेवरून शिंदे सरकारवर टीकास्त्र डागले आहे.
सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नसून स्वत:चंच पुर्नवसन करण्यासाठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज आल्याने सत्ताधारी पक्ष आता प्रचंड खटाटोपात आहे आणि ऐनकेन प्रकारे जनतेच्या समोर राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी जेवढी सत्ताधारी पक्ष स्वत:ची प्रसिद्धी करतील तेवढू सामान्य जनतेच्या मनात त्यांच्या बद्दल राग वाढत जाईल. आज राज्याची परिस्थिती काय आहे? राज्यावर कर्जाचा बोझा आहे, नवीन बांधलेल्या रस्त्यांनाही भेगा गेल्या आहेत, राज्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची चाळण झाली आहे. एसटी महामंडळाच्या बसेसची अवस्था खराब झाली आहे. शेतकऱ्यांची वेगवेगळ्या अडचणी आहेत. पीएचडीचे विद्यार्थी आंदोेलन करत आहेत हे सर्व सुरू असताना, राज्यावरचा कर्जाचा बोजा आठ लाख कोटींवर गेला आहे. सरकारच्या योजना या महाराष्ट्रातील जनतेसाठी नाही स्वत:चं पुर्नवसन करण्यासाठी आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
राज्य विधीमंडलाच्यापावसाळी अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प जाहीर केला. यात त्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’, ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन’, ‘महिलांना वर्षाला तीन मोफत सिलेंडर गॅस अशा योजनांची घोषणाही केली. या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिंदे सरकारने ‘विशेष प्रसिद्धी मोहिम’ सुरू करायची आहे. या योजनेसाठी 270 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.