संग्रहित फोटो
जत नगरपालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करत दाखल केला. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाना साधतानाच जतच्या स्थानिक नेत्यांवर टीका टीपण्णी करणार नाही, उलट जनतेसमोर विकासाचे नवे मॉडेल आणि ब्ल्यु प्रिंट घेवून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोमवारी सकाळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. रवींद्र आरळी यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्तीप्रदर्शन करत दाखल करण्यात आला. येथील बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरूवात झाली. ही पदयात्रा जत बसस्थानक, बाजार पेठ, गांधी चौक, नगर पालिका, संभाजी चौक ते शिवाजी पेठ येथे आली. येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले. यावेळी उमेदवार डॉ. रवींद्र आरळी, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गोब्बी, अशोकराव बन्नेनवार, सरदार पाटील, सुनील पवार, सुभाष गोब्बी, संजय तेली, आप्पा नामद, अण्णा भिसे, परशूराम मोरे, विक्रम ताड, रवी मानवर, पापा कुंभार, राजू यादव, सुभाष कांबळे, अनिल पाटील, लक्ष्मण जखगोंड, डॉ. प्रवीण वाघमोडे, डॉ. वीणा तंगडी, बसवराज चव्हाण, चंद्रकांत गुडडोडगी, स्वप्ना स्वामी, शारदा कुंभार यांच्यासह पदाधिकारी उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोपीचंद पडळकर म्हणाले, विधानसभेला तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला. त्याप्रमाणे जत शहराची पालिकाही आमच्या ताब्यात दया. मागच्या पन्नास वर्षात जितका निधी जतला आला नाही, तितका निधी फक्त एक वर्षात आणतो. येथे नगराध्यक्ष पदासाठी आपण डॉ. आरळींसारखा उच्च विद्याविभूषीत उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी जनतेला हवे असणारे चेहरे दिले आहेत. या निवडणुकीत राजकारण, गटतट न आणता विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा. माझ्याकडे शहराच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार आहे. एकदा संधी दया ज्याप्रमाणे आपण आज तालूक्यात काम करतो आहोत, त्याच्यापेक्षा अधिकचा निधी या शहराला देवू. शिवाय आपण स्वतः जतकरांच्या घराघरात जावून विकासाची संकल्पना मांडणार आहोत. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, भाजपाचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. आरळी म्हणाले, जत तालूक्यात विकासाचे नव पर्व सुरू झाले आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. गोपीचंद पडळकर यांचे काम आपण पाहीले आहे. त्यामुळे माझ्या विजयात अडचण नाही. अनेकांना मी वेळ देत नाही असे वाटत असेल पण आता इथून पुढचं सगळं आयुष्य जतच्या जनतेसाठी घालवणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.






