संग्रहित फोटो
ईश्वरपूर : महायुतीला पालिकेत सत्ता द्या, महिलांना सक्षम बनवण्यासाठी बचत गटाच्या योजना आणू. भाजप हा वैयक्तिक खासगी पक्ष नसून, तो सर्वसामान्य लोकांचा पक्ष आहे. उरुण-ईश्वरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपचाच नगराध्यक्ष होईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
यावेळी आमदार सदाभाऊ खोत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप सरचिटणीस राहुल महाडिक, चिमण डांगे, विक्रम पाटील, सी. बी. पाटील उपस्थिती होते. पंचायत समितीपासून रॅलीला सुरुवात झाली. यल्लामा चौकात येऊन रॅलीचे प्रचारसभेत रुपांतर झाले. सभा झाल्यानंतर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विश्वनाथ डांगे यांचा उमेदवारी अर्ज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला.
पालकमंत्री पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी उरूण-ईश्वरपुरच्या भुयारी गटार योजनेसाठी १९८ कोटी तर २४ बाय ७ पाणी योजनेसाठी १२४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. बाजार इमारतीसाठी ५२ कोटी दिले आहेत. स्वागत व प्रास्ताविक शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी केले.
जयंतराव पाटील तुमचं आव्हान स्वीकारले
भाजपा जिल्हाअध्यक्ष सम्राट महाडिक म्हणाले, आमची महायुती तुटणार असे काहीजण म्हणत होते. परंतु आमची महायुती एकसंघ आहे. विरोधकांना उमेदवार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विरोधकांनी तीस वर्षाच्या कालावधीत हजारो कोटी रुपये निधी आणला. मग तो कुठं जिरवला. विरोधक म्हणत होते हिंमत असेल तर कमळ चिन्ह घेऊन दाखवा. जयंतराव पाटील तुमचं आव्हान स्वीकारले आणि कमळ चिन्हावरच नगराध्यक्षपदाचा उमेदवार उभा केला आहे.
विरोधकांनी विकासापासून वंचित ठेवले
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, नगरपालिका म्हणजे या नगराचे प्राधिकरण असते. गेले पाच वर्षाचा कारभार आणि ३५ वर्षाचा कारभार प्रचारादरम्यान मी मांडणार आहे. विरोधकांनी शहराला विकासापासून वंचित ठेवण्याचे काम केले. भुयारी गटर योजना, २४ बाय ७ पाणी योजना ही विरोधकांच्या आडमुठेपणामुळे पूर्ण करता आली नाही.
पैसे लुटण्यासाठी सत्तेचा वापर
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले, ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे. सर्वसामान्य लोकांच्या भावना ओळखून आधी केले मग सांगितले. ४९ वर्षे तुमची सत्ता होती मग तुम्ही उरूण ईश्वरपूर का केले नाही. उरूणवासीयांचा यांनी अपमान केला. २० वर्षे तुम्ही मंत्री होता. तुम्ही पैसे लुटण्यासाठी सत्तेचा वापर केला. प्रत्येक गोष्टीत राजकारण का आणता. या नगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल.






