जलजीवन मिशनचे ५० लाखावरील निधीचे एकही काम पुर्ण नाही, आ. वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना घेतले फैलावर
२०१९ मध्ये जलजीवन मिशन योजना सुरु करण्यात आली असून गेली चार वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार वर्षात ५० लाखावरील निधीचे एकही जल- जीवन मिशनचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच जिल्ह्यातील या योजनेच्या कामाची ३७ कोटीची देयके मार्च २०२४ ला सादर केली असून आता नव्याने सादर केलेली २० कोटीची देयके अशी एकूण ५७ कोटीची देयके शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र हा ५७ कोटीचा निधी महायुती सरकारने थकीत ठेवला आहे. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समवेत ओरोस येथे जलजीवन मिशन योजनेच्या झालेल्या आढावा बैठकीत ही माहिती उघड झाली आहे. त्यावरून आमदार वैभव नाईक यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. सत्ताधाऱ्यांनी देखील याचा कधी आढावा घेतला नाही.
या योजनेच्या माध्यमातून “हर घर जल” या शासनाच्या उद्धेशाला हरताळ फासण्याचा प्रकार सिंधुदुर्गातील सत्ताधारी आणि अधिकारी यांनी केला आहे. उर्वरित महाराष्ट्रात एकत्रिक रित्या १ ते २ कोटीची नळयोजना राबवून त्या पूर्ण करण्यात आल्या आहेत. मात्र, सिंधुदुर्ग जिल्हा योजना राबविण्यात कमी पडत आहे. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत जर यात सुधारणा झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने महायुती सरकार आणि अधिकाऱ्यांविरोधात मोर्चा काढण्याचा इशारा आमदार वैभव नाईक यांनी दिला.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कुडाळ मालवण तालुक्यात सुरु असलेल्या कामांची आढावा बैठक आज आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, ओरोस येथे पार पडली. यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख,पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता सुदेश राणे, उपकार्यकारी अभियंता वाळके व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी कुडाळ मालवण मध्ये सुरु असलेल्या जल जीवन मिशनच्या कामांचा आढावा घेतला. या कामांमध्ये असलेल्या त्रुटी तसेच कामांमुळे गावात निर्माण झालेल्या समस्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिल्या. ग्रामपंचायत निहाय कामांचा आढावा घेऊन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी दिल्या.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शिवसेना प्रवक्ते मंदार केणी, कुडाळ संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन कदम, उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर यांसह लोकप्रतिनिधी व नागरिक उपस्थित होते.






