Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद शमीबाबत एक वाईट बातमी येत आहे. गेल्या वर्षी एकदिवसीय विश्वचषकात आपल्या गोलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या शमीच्या घोट्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्याची शस्त्रक्रिया पूर्णपणे यशस्वी झाली आणि शमी मैदानात परतण्याच्या तयारीत होता. शमीही नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला. याशिवाय तो काही दिवसांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करीत होता. मात्र, त्याच्या फिटनेसशी संबंधित एक अपडेट समोर आली आहे.
घोट्याला सूज आल्याची तक्रार
रिपोर्टनुसार, शमीने पुन्हा एकदा त्याच्या घोट्याला सूज आल्याची तक्रार केली आहे ज्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा परिस्थितीत शमीला पूर्णपणे बरा होण्यासाठी 6 ते 8 आठवडे लागू शकतात. यानंतर त्यांना त्यांचा फिटनेसही सिद्ध करावा लागेल. यावर्षी नोव्हेंबरमध्ये टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. अशा परिस्थितीत शमीचे या दौऱ्यासाठी जाणे अडचणीत येऊ शकते.
शमीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायची होती इच्छा
शस्त्रक्रियेनंतर शमी बरा झाल्यावर त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, दुलीप करंडक आणि इराणी चषकासाठी त्याला कोणत्याही संघात स्थान देण्यात आले नव्हते. अशा परिस्थितीत शमीला बंगालसाठी फक्त रणजी ट्रॉफीमध्ये खेळायचे राहिले होते, परंतु आता घोट्याच्या दुखापतीमुळे हे देखील कठीण दिसते आहे.
टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य
याशिवाय बीसीसीआयने असेही स्पष्ट केले आहे की, जर कोणत्याही खेळाडूला टीम इंडियामध्ये पुनरागमन करायचे असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे अनिवार्य असेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतल्याशिवाय कोणताही खेळाडू टीम इंडियामध्ये निवडीसाठी पात्र होणार नाही.






