कोरोनामुळे बंद असलेली मंदिरे सर्वसामान्यांना दर्शनासाठी खुली करण्यात यावीत असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केले आहे. जर बार उघडायला परवानगी देता तर मग मंदिर सुरु करायला परवानगी का दिली जात नाही? असा सवाल देखील अण्णांनी विचारला आहे. एवढेच नाही तर हजारे यांनी या मुद्यावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे असे आवाहन लोकांना केलं आहे.
राज्याच्या मंदिर बचाव कृती समितीच्या सदस्यांनी अण्णांची भेट घेऊन मंदिरे उघडण्यासाठी समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याबाबत माहिती दिली. यावेळी समिती सदस्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत अण्णांनी आपण समितीने केलेल्या आंदोलनात सहभागी होऊ असे आश्वासन दिले.
यावेळी बोलताना अण्णा म्हणाले की, “राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी सरकारला काय अडचण आहे ? दारूची दुकाने, हॉटेल सर्व उघडी केली आहेत. तिथे होत असलेल्या गर्दीतून करोना वाढत नाही का ? असा सवाल अण्णांनी उपस्थित केला.”
यापुढे बोलताना अण्णा म्हणाले की, “ज्या मंदिरातील दर्शनाने सात्विक विचारातून माणसे घडतात अशा मंदिरांना बंद करून सरकारने काय मिळवल ? मंदिरे उघडण्यासाठी जनतेने आता रस्त्यावर उतरले पाहिजे. मंदिर बचाव कृती समितेने यासाठी मोठे आंदोलन उभारावे. यात मी स्वतः सहभागी होईल.” असं अण्णांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अण्णा हजारे यांची ही मागणी केंद्राने जेव्हा गणपती आणि दहीहंडीसारख्या उत्सवांवर बंदी घालण्याचे निर्देश दिले त्याच वेळी पुढे आल्याने आता अण्णा केंद्र सरकारच्या निर्णया विरोधात आंदोलन करणार का हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.