अहमदनगर : सावेडी भागातील प्रकाश वाईन शॉपच्या मॅनेजरला लुटणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. वाईन शॉपमधील कामगारानेच इतरांना हाताशी धरून मॅनेजरला लुटल्याचा प्रकार तपासात समोर आला. लखन नामदेव वैरागर (रा.नागापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
रविवारी प्रकाश वाईन्सचे मॅनेजर आशीर बशीर शेख यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दहा लाख सत्तर हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. ही लूट प्रकाश वाईन शॉप दुकानात काम करणारा कामगार लखन वैरागर व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लखन यास ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर गुन्हा केल्याची कबुली दिली.
आणखी तिघांना अटक
लखन वैरागर यास अटक केल्यानंतर त्याने साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी प्रमोद बाळू वाघमारे (रा.नागपूर), विशाल भाऊसाहेब वैरागर (रा.रस्तापूर), दीपक राजू वाघमारे (रा.नागापूर) या तिघांनाही वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. चौघांना अटक करण्यात आली असून, टोळीचे दोन जण पसार झाले आहेत. आरोपीकडून पोलिसांनी पाच लाख २० हजार रुपयांची रोकड, साडेतीन लाख रुपयांच्या मोटरसायकली आणि ४२ हजार पाचशे रुपयाचे मोबाईल असा नऊ लाख दोन हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.