
थंडीमुळे कोरड्या केसांचा झाडू झाला आहे? मग 'या' पद्धतीने केसांवर लावा मोहरीचे तेल
हिवाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आरोग्य, त्वचा आणि केसांसंबधित बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. त्वचा कोरडी होण्यासोबत केस सुद्धा मोठ्या प्रमाणावर कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. थंड वातावरणाचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. केस कोरडे होणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे, टाळू कोरडी पडणे यांसारखी असंख्य लक्षणे दिसू लागतात. केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे केसांच्या आरोग्याकडे योग्य लक्ष देणे आवश्यक आहे. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर महिला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या शॅम्पू किंवा कंडिशनरचा वापर करतात. पण सतत केमिकल युक्त प्रॉडक्ट टाळूवर लागल्यामुळे खाज येणे, लाल रॅश येणे किंवा केसांच्या इतर समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. टाळूवरील त्वचा कोरडी झाल्यानंतर सतत खाज येते. (फोटो सौजन्य – istock)
थंडीत केसांवरून हात फिरवल्यास केस अतिशय कोरडे आणि निस्तेज झाल्यासारखे वाटू लागतात. केसांच्या वाढत्या समस्या कमी करण्यासाठी कोणत्याही हानिकारक शॅम्पूचा वापर न करता घरगुती उपाय करून केसांची योग्य काळजी घ्यावी. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे केसांवर नैसर्गिक चमक टिकून राहते आणि मऊ, शाईनी वाटू लागतात. मोहरीच्या तेलाचा वापर जेवणातील वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. या तेलाच्या वापरामुळे पदार्थाची चव सुंदर लागते.
मोहरीच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासोबतच केसांसाठी सुद्धा केला जातो. हे तेल अतिशय उष्ण असते. मोहरीच्या तेलाची मालिश केसांवर केल्यास रक्तभिसरण सुधारण्यास मदत होईल. याशिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळेल. केस गळती थांबवण्यासाठी मोहरीचे तेल प्रभावी ठरते. मोहरीचे तेल थेट केसांवर लावू नये. यामुळे तेलकट स्काल्प असलेल्या व्यक्तींची केस आणखीनच चिकट होऊ शकता. यासाठी वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन त्यात पाणी आणि कोरफड जेल घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. २ ते ३ मिनिटं झाल्यानंतर चमच्याने तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटावे. यामुळे मोहरीचे तेल पाण्यात व्यवस्थित मिक्स होईल.
तयार केलेले मिश्रण संपूर्ण केसांच्या मुळांपासून ते अगदी टोकांपर्यंत सगळीकडे लावून हलक्या हाताने मसाज करावा. यामुळे केसांमधील मुळांना भरपूर पोषण मिळेल. अर्धा तास ठेवल्यानंतर केस शॅम्पूच्या सहाय्याने स्वच्छ धुवून घ्या. केसांमध्ये मोहरीच्या तेलाचा चिकटपणा राहिल्यास कोंडा होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांमध्ये अजिबात तेल राहणार नाही, याची काळजी घ्यावी. मोहरीच्या तेलाचे मिश्रण केसांवर लावल्यास केस मऊ आणि मुलायम होतील. याशिवाय केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारेल.