बेलाच्या पानांचा वापर केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात
हिंदू संस्कृतीमध्ये महाशिवरात्री सणाला विशेष महत्व आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा करून बेलाची पाने शंकराला वाहिली जातात. धार्मिक दृष्ट्या बेलाच्या पानांना विशेष महत्व आहे.या पानांचा वापर शंकराची पूजा करताना प्रामुख्याने केला जातो. याशिवाय ही पाने आरोग्यासाठी सुद्धा अतिशय गुणकारी आणि फायदेशीर आहेत, बेलाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी प्रभावी ठरतात. यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे शरीरसंबंधित विविध समस्या दूर होऊन आरोग्य सुधारते. त्यामुळे दैनंदिन वापरात बेलाच्या पानांचा वापर करून शकता. बेलाच्या पानांना धार्मिक महत्वासोबतच आयुर्वेदिक म्हत्वसुद्धा आहे.(फोटो सौजन्य – iStock)
बेलाच्या पानांचा वापर केल्यामुळे पचनक्रिया सुधारते, रक्त शुद्ध होण्यास मदत होते, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते इत्यादी अनेक फायदे होतात. याशिवाय बेलाच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला बेलाच्या पानांचा वापर केल्यामुळे आरोग्याला नेमके काय फायदे होतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी बेलाच्या पानांचा वापर करावा. या पानांच्या रसाचे सेवन केल्यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारते. याशिवाय शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. अपचन, गॅस, ऍसिडिटी, बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी बेलाच्या पानांचे सेवन करावे. बेलाच्या पानांचा रस नियमित प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय तुम्ही बेलाच्या फळाचा रस सुद्धा पिऊ शकता.
जगभरात मधुमेहाच्या समस्येने अनेक लोक त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीरात मधुमेहाची लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर बेलाच्या पानांचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. यामुळे वाढलेला मधुमेह नियंत्रणात राहील.
हृदयाच्या निरोगी आरोग्यासाठी बेलाच्या पानांचा वापर तुम्ही करू शकता. या पानांमध्ये आढळून येणारे पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स, हृदयाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करते. याशिवाय बेलाच्या पानांचे नियमित सेवन केल्यास कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊन हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते.
चेहऱ्यावर पिंपल्स, मुरूम किंवा काळे डाग आल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात. बेलाचे पान रक्तशुद्ध करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. बेलाच्या पानांचा वापर केल्यामुळे चेहऱ्यावर मुरूम, डाग आणि त्वचेवरील संसर्ग इत्यादी अनेक समस्या कमी होतात आणि त्वचा स्वच्छ दिसते. यामध्ये आढळून येणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी मदत करतात.