
डायबिटीसमुळे स्पर्म्स आणि वंध्यत्वावर होतोय परिणाम (फोटो सौजन्य - iStock)
देशात मधुमेहाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. पुरुष आणि महिला या दोघांचाही यात समावेश आहे. अनेक पुरुषांना माहिती नाही की मधुमेह त्यांच्या प्रजनन आरोग्यावर परिणाम करु शकतो. अनेक पुरुषांना अनियंत्रित मधुमेहाची समस्या असते जे प्रजनन समस्यांना कारणीभूत ठरतो. मधुमेह हा पुरुषांमधील सर्वात सामान्य जीवनशैलीतील आजारांपैकी एक आहे. जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू शकत नाही, तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेह होतो. डॉ. प्राजक्ता चौधरी, फर्टिलिटी स्पेशालिस्ट, नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, अंधेरी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
काय आहे लक्षणे
खुप तहान लागणे, वारंवार लघवी होणे, थकवा येणे, दृष्टी कमकुवत होणे आणि जखमा बऱ्या होण्यास वेळ लागणे ही लक्षणे दिसतात. कालांतराने मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास त्यामुळे नसा, रक्तवाहिन्या, मूत्रपिंड, डोळे आणि प्रजनन अवयवांचे नुकसान होऊ शकते.
पुरूषांमधील वंध्यत्व: भारतात वाढतेय चिंता, WHO ने दिला इशारा
स्पर्मवरही होतो परिणाम
मधुमेहाचा संबंध शुक्राणूंच्या आरोग्याशी आहे. अनियंत्रित मधुमेहामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन, टेस्टोस्टेरॉन कमी होणे, कामवासना कमी होणे, वंध्यत्व येणे आणि शुक्राणूंच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, या सर्वांचा परिणाम प्रजननक्षमतेवर होतो. डॉक्टरांनी याबाबत अधिक काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. डायबिटीसकडे दुर्लक्ष करणं नक्कीच धोकादायक ठरू शकतं.
कसा होतो परिणाम?
मधुमेहाचा स्पर्म्सच्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. रक्तातील उच्च साखरेची पातळी शुक्राणूंच्या पेशींमधील डीएनएला नुकसान पोहोचवू शकते, ज्यामुळे स्त्रीबीजांचे फलन करण्याची त्यांची क्षमता कमी होते. अनियंत्रित मधुमेहाच्या ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होते, शुक्राणूंची हालचाल मंदावते आणि शुक्राणूंचा आकारही असामान्य असल्याचे दिसून येते.
मधुमेहामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आणि नसा कमकुवत होतात. यामुळे लिंगाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि ताठरपणा कमी होतो आणि त्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या येते,ज्यामुळे गर्भधारणेची शक्यता कमी होते. मधुमेहामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते म्हणजेच टेस्टोस्टेरॉन पातळी कमी होते त्यामुळे पालकत्वाची इच्छा बाळगणाऱ्या पुरुषांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.
शुक्राणूंच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी महत्वाचे उपाय
रक्तातील साखरेच्या पातळीचे नियमितपणे निरीक्षण करा आणि तज्ञांच्या सल्ल्यानुसार ते नियंत्रणात ठेवा. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे औषधे घ्या, दररोज किमान ४५ मिनिटे व्यायाम करा, योगा आणि ध्यानधारणा करून ताण कमी करा, वजन नियंत्रित राखा, संतुलित आहाराचे सेवन करा, धूम्रपान आणि मद्यपान टाळा आणि गर्भधारणेस प्रयत्न करत असल्यास हार्मोन आणि वीर्य विश्लेषणासह नियमित आरोग्य तपासणी करायला विसरु नका.
10 तासांपेक्षा झोपणे ठरू शकते गंभीर, वंध्यत्व-डायबिटीससह 5 आजारांचा वाढतो धोका
कसा होतो दुष्परिणाम
मधुमेहाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास पुरुषाच्या शुक्राणूंची गुणवत्ता खालावणे, हार्मोनल असंतुलन आणि लैंगिक कार्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. मात्र रक्तातील साखरेचे योग्य नियंत्रण करुन पुरुषांना त्यांच्या शुक्राणूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अनियंत्रित मधुमेह असलेल्या पुरुषांसाठी प्रजनन उपचार रक्तातील साखरचे नियंत्रण सुधारणे, हार्मोन्सचे संतुलन राखणे आणि शुक्राणूंच्या गुणवत्तेनुसार इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन (IUI) किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रांचा वापर करणे तसेच शुक्राणूंची संख्या किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन सारख्या समस्यांवर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे. कुटुंब नियोजन करु इच्छिणाऱ्या मधुमेही पुरुषांनी आपल्या आरोग्याचे योग्य मूल्यांकन करुन घेणे आणि वेळोवेळी वैद्यकिय मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.