
प्रजनन क्षमता जाणून घेण्यासाठी काय करावे (फोटो सौजन्य - iStock)
वय आणि प्रजननक्षमता
महिलांसाठी वयाच्या ३०व्या वर्षानंतर प्रजननक्षमता हळूहळू कमी होऊ लागते, तर ३५ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात प्रजननक्षमता कमी होते. पुरूषांच्या बाबतीत वयाच्या ४०व्या वर्षानंतर शुक्राणूंची गुणवत्ता कमी होऊ लागते. तुम्ही या वयाच्या जवळ पोहोचत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही सुसज्ज असले तरी प्रजननक्षमता अनुकूल असेलच असे नाही.
मासिक पाळीचे स्वरूप
तुमची मासिक पाळी नियमित आहे का? ओव्हुलेशन अपेक्षित वेळी होते का? तुम्हाला मासिक पाळीत खूप जास्त वेदना होतात किंवा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतो का? अनियंत्रित मासिक पाळी हे ओव्हुलेशनमधील समस्यांचे लक्षण असू शकते, तर तीव्र वेदना एंडोमेट्रिओसिस सारख्या स्थितीचे लक्षण असू शकते. नियमित मासिक पाळी म्हणजे हार्मोन्स संतुलित असण्याचे लक्षण आहे.
आरोग्याशी संबंधित वैद्यकीय स्थिती
काही विशिष्ट आजार किंवा शारीरिक स्थितीचा प्रत्यक्ष प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. यामध्ये पीसीओएस, थायरॉईड, फायब्रोईस, एंडोमेट्रिओसिस, मधुमेह किंवा ऑटोइम्यून आजार यांचा समावेश असतो. पुरुषांच्या बाबतीत पूर्वी झालेली एखादी शस्त्रक्रिया, व्हेरिकोसेल, जुनाट आजार किंवा अति उष्णतेशी येणारा संपर्क या गोष्टी शुक्राणूंच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. हे घटक वेळीच ओळखून त्याकडे लक्ष दिल्यास संभाव्य आव्हानांवर मात करता येते.
जीवनशैली निवड
तुम्ही पुरेशी झोप घेत आहात का? शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहात का? मानसिक तणावाचे योग्य व्यवस्थापन करत आहात का? धूम्रपान, मद्यपान, अपुरी झोप, वाढलेला बीएमआय आणि बैठेकाम करण्याची जीवनशैली या सर्वांचा प्रजनन आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जीवनशैलीमध्ये लहान अनुकूल बदल देखील प्रजननक्षमतेसाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.
प्रजननसंदर्भात पूर्वीचे अनुभव
तुम्ही वर्षभरापासून (किंवा वय ३५ पेक्षा जास्त असल्यास सहा महिन्यांपासून) गर्भधारणेसाठी प्रयत्न करत आहात, पण त्यामध्ये यश आलेले नाही? तुम्हाला गर्भपात, केमिकल प्रेग्नन्सी, एक्टोपिक प्रेग्नन्सी किंवा दीर्घकाळ प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे अशा अनुभवांना सामोरे जावे लागले आहे का? या अनुभवांची नोंद ठेवल्यास तुमच्या प्रजननक्षमतेमधील महत्त्वाचे पैलू समजण्यास मदत होऊ शकते.
औषधोपचार आणि गर्भनिरोधकांचा वापर
काही विशिष्ट औषधे ओव्हुलेशन किंवा शुक्राणूंच्या निर्मितीमध्ये अडथळा आणू शकतात. दीर्घकाळ गर्भनिरोधकांचा वापर केल्यामुळे वंध्यत्व येत नाही, पण यामुळे नैसर्गिक मासिक पाळी चक्रामध्ये अडथळा येऊ शकतो. तसेच, गर्भनिरोधकांचा वापर थांबवल्यानंतर शारीरिक स्थितीबाबत अंदाज घेणे कठीण होऊ शकते.
स्वत:हून संपूर्ण मूल्यमापन केल्यानंतर काय करावे? तुमचे बहुतेक घटक सामान्य दिसत असतील तर ती दिलासादायक बाब आहे, पण पूर्णपणे खात्री देत नाही. तुम्हाला दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळजी करण्यासारखे घटक आढळले तर उशीर न करता फर्टिलिटी स्पेशालिस्टचा (प्रजनन तज्ज्ञ) सल्ला घ्या. यामुळे तुमचा वेळ वाचेल, उपचारांचा खर्च कमी होईल आणि भविष्यातील मानसिक ताण देखील टाळता येईल. कुटुंब नियोजनाची तयारी योग्य वेळी करण्यासोबत तुमच्या आजच्या प्रजननक्षमतेबाबत जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील स्वप्नांना अनुसरून योग्य निर्णय घेऊ शकाल.