
कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा! जिल्हा रुग्णालयात 'मोफत किमोथेरपी' सुरू
दीर्घ प्रतीक्षेनंतर केंद्र कार्यान्वित
फेब्रुवारी महिन्यात मोठ्या अपेक्षांनी जिल्हा रुग्णालयात डे केअर किमोथेरपी सेंटरचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र, आवश्यक औषधे आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने हे सेंटर प्रत्यक्ष उपचारांशिवायच राहिले. परिणामी कर्करोग रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांकडे धाव घ्यावी लागत होती. त्यातून अनेक कुटुंबांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला, दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आणि मानसिक तणाव वाढला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांच्या पुढाकाराने हे सेंटर कार्यान्वित झाले.
रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये समाधान व्यक्त
सोमवारी चाळीसगाव येथील एका महिला रुग्णावर पहिली मोफत किमोथेरपी देण्यात आली. अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा रुग्णालयातील किमोथेरपी सेंटर प्रत्यक्षात सुरू झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. या वेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके, डॉ. पद्मजा सराफ, डॉ. कीर्ती तांदळे, डॉ. जितेंद्र डोंगरे उपस्थित होते. प्रत्यक्ष किमोथेरपी उपचार तज्ज्ञ डॉ. विराज बोरगावकर यांनी अत्यंत दक्षतेने केले. उपचारादरम्यान परिचारिका पूजा डुकरे यांनी सहकार्य केले.
दररोज दहा रुग्णांना मोफत उपचार
जिल्हा सामान्य रुग्णालयात उभारण्यात आलेल्या दहा खाटांच्या डे केअर किमोथेरपी सेंटरमध्ये दररोज दहा कर्करोग रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार दिले जाणार आहेत. तपासण्या, औषधे तसेच किमोथेरपी या सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध असणार आहेत, त्यामुळे पैसे नाहीत म्हणून उपचार कसे करायचे? हा प्रश्न आता अनेक रुग्णांच्या आयुष्यातून दूर होणार आहे.
कुणीच भीती बाळगू नका, उपचारासाठी पुढे या
८८ कर्करोग रुग्णांनी कोणतीही भीती बाळगू नये. आर्थिक अडचणीचा विचार न करता जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पुढे यावे. येथे किमोथेरपीसह सर्व उपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. गरजू रुग्णांनी या सेवेचा लाभघ्यावा. असे डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी म्हटले आहे.
ताण आता होणार कमी
या सुविधेमुळे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय कर्करोग रुग्णालयावरील उपचारांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय है आधारवड ठरणार आहे. वेळेत आणि योग्य उपचार मिळाल्यास कर्करोगावर मात करण्याची लढाई अधिक प्रभावीपणे लढता येते, असा विश्वास वा सेवेने निर्माण केला आहे.