
केमिकल ट्रीटमेंटमुळे केस खराब झाले आहेत? मग आठवड्यातून एकदा केसांवर लावा नॅचरल हेअरमास्क
केस सुंदर दिसण्यासाठी सर्वच महिला सतत काहींना काही करत असतात. कधी केमिकल ट्रीटमेंट करून घेतल्या जातात तर कधी बाजारात उपलब्ध असलेले महागडे हेअर केअर प्रॉडक्ट, शॅम्पू वापरून केसांची काळजी घेतली जाते. पण सतत केल्या जाणाऱ्या केमिकल ट्रीटमेंटमुळे केसांना खूप जास्त हानी पोहचते आणि केस नाजूक होऊन जातात. हानिकारक रसायनांचा वापर केल्यामुळे केसांची मूळ कमकुवत होतात. यामुळे केस गळणे, केसांमध्ये कोंडा होणे, केस अचानक तुटणे, केसांची वाढ न होणे इत्यादी बऱ्याच समस्या उद्भवू लागतात. केस सॉफ्ट आणि मुलायम होण्यासाठी शाम्पू, सीरम, स्प्रे, जेल, हेअर कलर, स्ट्रेटनिंग आणि स्मूदनिंगसारख्या ट्रीटमेंट्स केल्यानंतर केसांच्या मुळांमधील आवश्यक पोषण नष्ट होते आणि केस अतिशय कोरडे आणि कमकुवत होऊन जातात. (फोटो सौजन्य – istock)
केसांची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करावे लागतात. चुकीच्या आहाराचा परिणाम लगेच केसांवर दिसून येतो. त्यामुळे केसांची खूप जास्त काळजी घ्यावी. आज आम्ही तुम्हाला केमिकल ट्रीटमेंट करून कोरडे झालेले केस पुन्हा नव्याने चमकदार करण्यासाठी नॅचरल हेअर मास्क बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हेअर मास्क केसांना लावल्यामुळेकेसांच्या मुळांना पोषण मिळेल आणि केस मऊ आणि सॉफ्ट होतील. याशिवाय केसांमधील नैसर्गिक चमक कायम टिकून राहील. नैसर्गिक पदार्थांचा वापर केल्यामुळे केस चमकदार वाटतात. चला तर जाणून घेऊया नॅचरल हेअरमास्क बनवण्याची सोपी कृती.
हेअर मास्क बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात ३ चमचे अळशीच्या बिया घालून मंद आचेवर उकळवून घ्या. बिया शिजल्यानंतर जेल तयार होईल. त्यानंतर गॅस बंद करून अळशीच्या बियांचे जेल गाळून घ्या. त्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून मिक्स करा. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कोरफडीचा गर, अळशीचा जेल आणि उकडलेले तांदूळ बारीक वाटून घ्या. तयार केलेला हेअर मास्क वाटीमध्ये काढून त्यात ऑलिव्ह ऑइल, नारळाचे तेल घालून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर हेअर मास्क तयार होईल.
तयार केलेला हेअर मास्क केसांना लावण्याआधी केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या टोकांपासून ते अगदी मुळांपर्यंत सगळीकडे हेअर मास्क लावून ३० ते ४० मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर अतिशय सौम्य शाम्पूच्या सहाय्याने केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तयार केलेला हेअरमास्क तुम्ही आठवड्यातून एकदा केसांवर लावू शकता. यामुळे तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसतील. अळशीच्या बियांमध्ये असलेले गुणकारी घटक केसांना भरपूर पोषण देतात. याशिवाय कोरफड जेल केसांना लावल्यामुळे केस मऊ आणि हायड्रेट राहतात.