अॅसिडिटीवर आयुर्वेदिक उपाय
हल्ली खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये सतत होणाऱ्या बदलांमुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. जंक फूडचे अतिसेवन, अपुरी झोप, कधीही जेवणे इत्यादी गोष्टींचा शरीरावर चुकीचा परिणाम होतो. त्यामुळे आहारात तेलकट किंवा तिखट पदार्थांचे कमीत कमी सेवन करावे. पचनक्रिया बिघडल्यानंतर अॅसिडिटीची समस्या वाढू लागते. शरीरात पित्ताची पातळी वाढू लागल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे रोजच्या आहारात मसालेदार पदार्थ, कॅफिन, धूम्रपान, मद्यपान आणि ताण इत्यादी अनेक गोष्टींमुळे शरीरात अॅसिडिटी वाढू लागते.(फोटो सौजन्य – iStock)
शरीरात वाढलेल्या अॅसिडिटीमुळे वारंवार छातीमध्ये जळजळ होणे, सतत आंबट ढेकर येणे, मळमळ होणे आणि तोंडात घाणेरडे पाणी येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या सर्व समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी कोणते आयुर्वेदिक उपाय करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याशिवाय या पानांमध्ये शांत आणि वायूरोधक गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे आम्लपित्त, वायू आणि उलट्यांपासून आराम मिळतो. अॅसिडिटी वाढल्यानंतर तुळशीचे पान चावून खावे. तुळशीचे पान चावून खाल्यामुळे शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी होईल. याशिवाय तुम्ही तुळशीच्या पानांचा काढा बनवून देखील पिऊ शकता.
शरीरात वाढलेली अॅसिडिटी कमी करण्यासाठी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले पाचक एंजाइम्सच्या उत्पादनास चालना देऊन शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. गॅस, पोटफुगी, अपचन आणि आम्लता या सर्व समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी बडीशेपचे सेवन करावे. यासाठी टोपात एक ग्लास पाणी घेऊन उकळवून घ्या. त्यानंतर पाणी थंड करून सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे तात्काळ आराम मिळेल.
शरीरात वाढलेले आम्ल्पिताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिरं प्रभावी आहे. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करावे. यामुळे पोटात साचून राहिलेली विषारी घाण स्वच्छ होण्यास मदत होईल. याशिवाय जठरासंबंधित समस्यांपासून आराम मिळेल. आरोग्यासंबंधित इतर समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी सुद्धा तुम्ही जिऱ्याचा पाण्याचे सेवन करू शकता.
लघवी करताना जळजळ होते? किडनी स्टोनच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ पदार्थांचे सेवन
अनेकदा शरीरात वाढलेल्या तणावामुळे अॅसिडिटी होण्याची शक्यता असते. अॅसिडिटी वाढल्यानंतर ढेकर येणे, काही खाण्याची इच्छा न होणे, पोटात दुखणे, उलट्या इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर अनेक लोक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करतात. मात्र असे न करता घरगुती आणि आयुर्वेदिक उपचार करून आराम मिळवावा. घरगुती उपाय केल्यामुळे शरीराला इतरही फायदे होतात आणि आरोग्य सुधारते. अॅसिडिटी वाढल्यानंतर कोरफडच्या रसाचे सेवन करावे. कोरफडमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म पोटात होणारी जळजळ कमी करतात.