
Library Cafe Trend
Pune News : दक्षिण पुण्यात वारंवार वीज खंडित, नागरिक संतप्त; महावितरणविरोधात रोष
लायब्ररी कॅफे ही केवळ खाण्या-पिण्याची जागा नसून ती एक सांस्कृतिक संवादाची नवी जागा बनत आहे. अनेक कॅफेंमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्य, आत्मचरित्रे, कादंबऱ्या, कविता संग्रह, व्यवसायविषयक पुस्तके आणि स्पर्धा परीक्षांची पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. काही ठिकाणी ‘बुक एक्स्चेंज’, लेखक भेट, कविसंमेलन, कथाकथन आणि ओपन माइकसारखे उपक्रमही आयोजित केले जात आहेत. त्यामुळे पारंपरिक वाचनालयांपेक्षा अधिक मुक्त आणि आधुनिक वातावरण येथे अनुभवायला मिळत आहे.
कोवर्किंग स्पेस आणि कॅफे संस्कृतीचा प्रभावही या वाढत्या ट्रेंडमागे असल्याचे दिसते. वर्क फ्रॉम होम करणारे युवक-युवती, स्टार्टअप क्षेत्रातील तरुण आणि कंटेंट क्रिएटर्स शांत व सर्जनशील वातावरणाच्या शोधात असतात. लायब्ररी कॅफे त्यांची ही गरज पूर्ण करत आहेत. अनेक कॅफेंमध्ये हायस्पीड इंटरनेट, चार्जिंग पॉइंट्स, स्वतंत्र वाचन कोपरे आणि दीर्घ वेळ बसण्याची सुविधा दिली जात असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.
विशेष म्हणजे, पुण्याची सांस्कृतिक आणि शैक्षणिक ओळख लक्षात घेऊन अनेक उद्योजक या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात शहराच्या उपनगरांमध्ये आणि महाविद्यालयीन परिसरात आणखी नवीन लायब्ररी कॅफे सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाचनाची आवड, निवांतपणा आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम घडवणारी ही संकल्पना पुण्याच्या सांस्कृतिक जीवनात नवा अध्याय लिहित असल्याचे चित्र दिसत आहे. पुस्तकांच्या सहवासात कॉफीचा आस्वाद घेत संवाद साधण्याची ही नवी पद्धत तरुण पिढीला विशेष भावत असून, पुण्यातील लायब्ररी कॅफे भविष्यात अधिक विस्तारतील, अशी चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
विद्यार्थी, जगदीश बामणे म्हणतो पुण्यातील ‘लायब्ररी कॅफे’चा हा नवा ट्रेंड खरोखरच खूप छान आणि गरजेचा आहे. आजकाल सगळेच मोबाईलमध्ये व्यस्त असताना, कॉफी पिता पिता पुस्तकं वाचण्याची ही पद्धत तरुणांना पुन्हा वाचनाकडे आकर्षित करत आहे. शांत वातावरणात काम करणे किंवा आवडीचे पुस्तक वाचणे मनाला सुकवून लावते. आपल्या पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारी ही आधुनिक वाचनसंस्कृती नक्कीच कौतुकास्पद आहे!
विद्यार्थी, हिमांशी भैसारे याने म्हटले की, आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि सोशल मीडियामुळे वाचन संस्कृती कमी होताना दिसते. अशावेळी लायब्ररी कॅफे ही संकल्पना वाचनाची आवड वाढवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. येथे शांत वातावरणात कॉफीचा आस्वाद घेत पुस्तके वाचण्याचा आनंद मिळतो. कादंबऱ्या, चरित्रे, स्पर्धा परीक्षांची पुस्तके अशा विविध साहित्यामुळे विद्यार्थी आणि वाचक आकर्षित होतात. धकाधकीच्या जीवनात निवांत वाचनासाठी ही उत्तम जागा ठरते. अशा उपक्रमांमुळे ज्ञानवृद्धी, विचारांची देवाणघेवाण आणि सकारात्मक बदल घडण्यास मदत होते. नव्या पिढीत वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी लायब्ररी कॅफे ही काळाची गरज आहे.