संग्रहित फोटो
पुणे : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण पुण्यातील कात्रज, सुखसागर नगर, आंबेगाव, दत्तनगर, संतोषनगर, अंजनीनगर तसेच नव्याने समाविष्ट गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह व्यावसायिक हैराण झाले आहेत. भर उन्हाळ्यात तासन् तास वीज गायब राहत असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही पूर्वसूचना न देता दिवसातून अनेकदा वीजपुरवठा बंद केला जात आहे. सुखसागरनगर परिसरात मागील दोन दिवस रात्री तब्बल सात ते आठ तास वीजपुरवठा खंडित राहिल्याने नागरिकांना उकाड्यात रात्र काढावी लागली. वीज नसल्यामुळे सोसायट्यांतील पाण्याचे पंप बंद पडून पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. महावितरणकडून बुधवारी रात्री ब्रेकडाऊन झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
“महावितरणकडून कोणतीही पूर्वकल्पना न देता रात्री-अपरात्री वीज खंडित केली जात आहे. भर उन्हाळ्यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ही समस्या तातडीने सोडवावी.” – दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक.
धानोरी-लोहगाव परिसरातही भारनियमनाचा फटका
धानोरी आणि लोहगाव परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे वीजपुरवठा यंत्रणेवर ताण वाढला असून, वारंवार भारनियमनाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून बोपखेल व्हीएसएनएल एसटीएन ते पोरवाल एसटीएन आणि बोपखेल व्हीएसएनएल एसटीएन ते संतनगर एसटीएन, लोहगाव या दोन डबल रन इन्कमर केबल टाकण्याच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र प्रत्यक्ष कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. काही दिवसांपूर्वी धानोरी परिसरात इन्कमर लाईनमध्ये बिघाड झाल्याने जवळपास पाच तास वीजपुरवठा खंडित झाला होता. पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.
“धानोरी-लोहगाव परिसरातील नागरिकांना सातत्याने भारनियमनाचा त्रास सहन करावा लागत आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही कामे रखडली आहेत. दोन्ही केबल प्रकल्प तातडीने सुरू करून वीजपुरवठा सुरळीत करावा.” – आमदार बापूसाहेब पठारे.






