Pitru Paksh 2025 : बिहारमधील एकमात्र असे ठिकाण जिथे केले जाते आत्मपिंडदान, जिवंतपणीच साधली जाते पितृऋणातून मुक्ती
भाद्रपद मासातील पौर्णिमेपासून आश्विन महिन्याच्या अमावास्येपर्यंतचा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. या दिवसांत लोक आपल्या घरातील निधन झालेल्या पूर्वज, आई-वडील, आजी-आजोबा अशा आप्तांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्रद्धा व तर्पण विधी करतात. या पूर्वजांनाच पितृ असे संबोधले जाते. पितृकर्म आणि दानधर्म केल्याने पूर्वज प्रसन्न होतात व आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे. याच कारणामुळे मृत्यूनंतर पिंडदान ही पुढील पिढीने करायची महत्त्वाची परंपरा मानली जाते.
गया येथील आत्मपिंडदान मंदिर
बिहारमधील गया हे पिंडदानासाठी अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. येथे पितरांचे श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्यानंतर पितृऋणातून मुक्ती मिळते, अशी धारणा आहे. रामायणकाळापासून ही परंपरा चालत आलेली आहे. भगवान श्रीरामांनी आपल्या भावांसह गयेतच राजा दशरथांचे पिंडदान करून त्यांना मोक्ष मिळवून दिला होता. त्यामुळे आजही हजारो लोक येथे येऊन पितरांसाठी पिंडदान करतात. पण याच गयेत एक अनोखे मंदिर आहे – जनार्दन वेदी मंदिर, जिथे लोक स्वतःचाच पिंडदान करतात.
आत्मपिंडदानाची परंपरा
गयेत एकूण ५४ पिंडवेद्या व ५३ पिंडदान स्थळे आहेत. मात्र जनार्दन वेदी ही एकमेव अशी जागा आहे जिथे आत्मश्राद्ध केले जाते. या ठिकाणी लोक जिवंत असतानाच आपले पिंडदान करतात. गयेतल्या भस्मकूट पर्वतावर वसलेल्या मंगला गौरी मंदिराच्या उत्तरेला हे वेदीस्थान आहे. येथे स्वतः भगवान विष्णु जनार्दन स्वामीच्या रूपाने पिंड स्वीकारतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
कोण करतात आत्मपिंडदान?
– ज्यांच्या परिवारात कोणीही वारसदार उरलेला नाही
– ज्यांच्या निधनानंतर त्यांचे श्राद्ध करणारा कोणीही नसेल
– तसेच गृहस्थाश्रमाचा त्याग करून वैरागी झालेले लोक
अशा व्यक्ती स्वतःच्या जिवंतपणी गयेत जाऊन आत्मपिंडदान करतात. ही परंपरा अनोखी असून लोक याला आत्मशांती व मोक्षप्राप्तीचा मार्ग मानतात.
पितृ पक्ष का महत्त्वाचा आहे?
पितृ पक्षातील विधींमुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात, असे मानले जाते. पितृदोष कमी करण्यासाठी आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध विधी करणे एक प्रभावी उपाय मानला जातो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
पितृ पक्षात काय करावे आणि काय करू नये?
काय करावे:
श्राद्ध आणि तर्पण विधी करावे.
पूर्वजांच्या आत्म्याची शांती आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.
पितरांना शांत करण्यासाठी आणि त्यांना आदर देण्यासाठी नियम पाळावेत.
काय करू नये:
या काळात नवीन कपडे, सौंदर्यप्रसाधने, नवीन मालमत्ता खरेदी करणे आणि नवीन मालमत्ता खरेदी करणे टाळावे, कारण असे करणे अशुभ मानले जाते. या काळात शक्यतो ब्रह्मचर्य पाळावे, कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि घरात फिरतात असे मानले जाते. नवीन व्यवसाय किंवा नवीन उपक्रम सुरू करणे टाळावे.