
भारतामध्ये राजकारणी लोकांसंबंधी एक गोष्ट सामान्य माणूस म्हणून आपल्याला नक्की जाणवत असेल, ती म्हणजे या नेते लोकांची आपल्या तब्येतीकडे असलेली दुर्लक्षता. व्यासपीठावरची भाषणे असोत कि विधानसभांची सत्रे अनेक नेते, मंत्री लोकांचा हे ‘वाढलेले पोट’ लोकांच्या नजरेत भरते. प्रथमदर्शनी जरी ही असंतुलित जीवनशैली किंवा केवळ आळस वाटत असला तरी, त्यामागे बरीच वैज्ञानिक करणे लपलेली आहेत. यामागे फक्त आहाराच नव्हे, मानवी शरीराचे गणित, तणावपूर्ण जीवनशैली आणि भारतीय जेनेटिक्स म्हणजेच जनुकांचाही यावर प्रभाव असतो. याबद्दलच आपण आज जाणून घेऊयात,
कॉर्टिसॉल हार्मोन आणि तणावपुर्ण जीवनशैली
राजकीय जीवन हे सततच्या घडामोडींनी ताणतणावाने भरलेले असते. निवडणुकांचे नियोजन, जनतेचे प्रश्न, पक्षातल्या घडामोडी, सततचे दौरे आणि प्रवास यामुळे शरीरातील कॉर्टिसॉल या स्ट्रेस हार्मोनचे प्रमाण वाढत असते. परिणामी या स्ट्रेस हार्मोनची पातळी नेहमी जास्त राहते.
वैद्यकीयशास्त्रानुसार, जेव्हा शरीरात कॉर्टिसॉलचे प्रमाण जास्त असते, तेव्हा शरीर ऊर्जेचे रुपांतर चरबीत करून ती मुख्यत्वे पोटाच्या भागात साठवून ठेवते. याला व्हिसरल फॅट असे म्हणतात, जे सहजासहजी कमी होत नाही.
अनियमित आणि उच्च-कॅलरी आहार
नेतेमंडळींना दररोज शेकडो लोकान भेटावे लागते. त्यामुळे नियमित आहार वेळेवर घेणे शक्य नसते.या भेटाभेटींच्या दरम्यान, प्रवासांच्या दरम्यान किंवा बैठकांमध्ये वेळेवर जेवण्याचीही भ्रांत होते. अशा प्रत्येक भेटीदरम्यान सततचा पाहुणचार केला जात असतो. या पाहुणचारात चहा, कॉफी, मिठाई, तळलेले पदार्थ प्रेमाने दिले जातात, आणि भारतीय पाहुणचार संस्कृतीप्रमाणे अशा प्रेमाने केलेल्या पाहुणचाराला नाही म्हणता येत नाही. या सगळ्या अन्नपदार्थात खूप जास्त प्रमाणात कॅलरीज असतात; ज्या परिणामी वजन वाढायला आणि पोटाबरोबरची चरबी वाढायला कारणीभूत ठरतात.
याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे रात्री-अपरात्री जेवण्याच्या सवयी. रात्री उशिरा पर्यंत चालणार्या बैठकामुळे रात्रीचे जेवण बऱ्याचदा २-३ वाजता होते. जेवल्यानंतर लगेच झोपल्यामुळे कॅलरीजचे पचन न होता त्या पोटावर चरबीच्या स्वरूपात साठतात.
शारीरिक हालचालींचा आणि व्यायामाचा अभाव
जरी राजकारणी सतत दौऱ्यावर दिसत असले, तरी त्यांचा प्रत्यक्ष शारीरिक व्यायाम फार कमी होतो. त्यांचा बहुतांश वेळ गाड्यांमध्ये बसून प्रवास करण्यात, सभांमध्ये एकाच ठिकाणी तासन् तास बसून राहण्यात आणि बैठकांमध्ये जातो. शारीरिक हालचाल कमी झाल्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया मंदावते. परिणामी, अन्नातून मिळणाऱ्या कॅलरीज जाळल्या जात नाहीत.
अपुरी झोप आणि हॉर्मोन्सचे असंतुलन
सततचे दौरे आणि प्रवासांमुळे अनेक मंत्र्यांना, नेतेमंडळीना रोजची केवळ ४ ते 5 तासाची झोप मिळते. या अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील दोन महत्त्वाच्या हार्मोन्सचे गणित बिघडते. ते असे कि घ्रेलिन हे भूक वाढवणारे हार्मोन जास्त प्रमाणात शरीरात तयार होते. आणि लेप्टिन हे पोट भरल्याची जाणीव करून देणारे हार्मोन कमी होते. यामुळे उशिरा रात्री गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याच्या क्रेविंग होतात.
दक्षिण आशियाई जेनेटिक्स
भारतीय किंवा दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये जनुकीयदृष्ट्या पोटावर चरबी साठण्याची नैसर्गिक प्रवृत्ती असते. वैद्यकीय भाषेत याला TOFI (Thin Outside, Fat Inside) किंवा अॅब्डोमिनल अॅडिपोसिटी म्हणतात. इतर देशांतील लोकांच्या तुलनेत भारतीयांच्या यकृत आणि पोटातील अवयवांभोवती चरबी लवकर साठते. शिवाय, सहसा चाळीशीच्या पुढील पुरुषांमध्ये पोटावरती चरबी साठण्याचे प्रमाण जास्त रीतीने समाजात दिसून येत असते.
पाहायला गेले तर, फक्त राजकारणीच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रातील तणावपूर्ण काम करणाऱ्या व्यक्तींचे सहसा असे आरोग्य संबंधी निदर्शनास येतात.
एकंदरीत, भारतीय राजकारण्यांचे वाढलेले पोट हे केवळ जास्त खाण्यामुळे नसून, अनियंत्रित दिनक्रम, अपुरी झोप, मानसिक ताण आणि भारतीय शरीराची जैविक रचना या सर्वांचा एकत्र परिणाम आहे, असे मिळालेल्या माहितीनुसार समजते. जोपर्यंत कामाच्या व्यस्ततेत आरोग्याला आणि दैनंदिन व्यायामाला प्राधान्य दिले जात नाही, तोपर्यंत ही समस्या राजकीय वर्तुळात अशीच दिसून येत राहील.