
photo- yandex
पावसाळा सुरू होताच वातावरण आल्हाददायक होते. पावसाळा उष्णतेपासून दिलासा देत असला तरी, तो आपल्यासोबत अनेक आरोग्य समस्याही घेऊन येतो. अशावेळी खाण्या-पिण्याच्यी योग्य काळजी न घेतल्यास आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. त्यातच बाजारात दिसणाऱ्या हिरव्या भाज्या आरोग्यदायी वाटत असल्या तरी या ऋतूमध्ये वाढलेली आर्द्रता, दूषित पाणी, बुरशी आणि जंतूंची वाढ यामुळे काही भाज्यांचे सेवन करताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात काही भाज्या योग्य प्रकारे स्वच्छ न करता किंवा पूर्णपणे शिजवून न खाल्ल्यास पोटाचे विकार, अन्नातून होणारे संक्रमण आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पावसाळ्यात कोणत्या भाज्या खाणं टाळावे, जाणून घ्या.
पालक, मेथी, वांगी, लेट्यूस आणि कोबीसारख्या पालेभाज्यांमध्ये पावसाळ्यात माती, बॅक्टेरिया, बुरशी आणि सूक्ष्म किडे अडकण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे या भाज्या खाण्यापूर्वी अनेक वेळा स्वच्छ धुवून पूर्णपणे शिजवणे गरजेचे आहे.
फ्लॉवर व कोबीच्या थरांमध्ये सूक्ष्म किडे आणि घाण सहज लपून राहू शकते. त्यामुळे या भाज्या मीठ किंवा हळद घातलेल्या पाण्यात काही वेळ भिजवून नंतरच वापरण्याचा सल्ला दिला जातो.
मशरूममध्ये नैसर्गिकरीत्या ओलावा जास्त असल्याने ते लवकर खराब होऊ शकतात. जुने किंवा योग्यरीत्या साठवलेले नसलेले मशरूम खाल्ल्यास अन्नविषबाधेचा धोका वाढू शकतो.
पावसाळ्यात काकडी, टोमॅटो, गाजर किंवा इतर कच्च्या भाज्यांचे सॅलड खाताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. नीट धुतलेल्या आणि ताज्या भाज्यांचाच वापर करावा.
खुल्या वातावरणात बराच वेळ ठेवलेल्या किंवा आधीच कापलेल्या भाज्यांवर जंतू वाढण्याची शक्यता असते. अशा भाज्यांपासून दूर राहणे अधिक सुरक्षित ठरते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
एक रुपयाही खर्च न करता घरच्या घरी मिळवा पार्लरसारखा ग्लो; हळदीचे ‘हे’ फेस पॅक नक्की करा ट्राय