
photo- yandex
म्युझिक ऐकत किंवा व्हाईट नॉईजच्या मदतीने झोपण्याची सवय अनेकांना असते. त्यामुळे बरेच जण रात्रभर कानात इअरबड्स ( Earbuds) घालून झोपतात. मात्र, ही सवय दीर्घकाळ कायम राहिल्यास कानांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. सतत इअरबड्स वापरल्याने कानातील नैसर्गिक मळ (Earwax) आत ढकलला जाऊ शकतो आणि त्यामुळे कानाच्या संसर्गासह इतर गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका वाढतो.
कानातील मळ हा शरीराची नैसर्गिक संरक्षण यंत्रणा आहे. तो धूळ, जंतू आणि सूक्ष्म कणांपासून कानाचे संरक्षण करतो. मात्र, इअरबड्स दीर्घकाळ कानात राहिल्यास हा मळ बाहेर येण्याऐवजी आत ढकलला जातो. त्यामुळे कान बंद झाल्यासारखे वाटणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे किंवा कानात सतत आवाज येणे अशा समस्या उद्भवू शकतात.
रात्रभर इअरबड्स वापरल्याने कानामध्ये उष्ण आणि ओलसर वातावरण तयार होते. अशा परिस्थितीत बॅक्टेरिया आणि बुरशीची वाढ वेगाने होऊ शकते. विशेषतः आंघोळीनंतर किंवा ओले केस असताना इअरबड्स वापरल्यास बाह्य कानाच्या संसर्गाचा धोका अधिक वाढतो.
सतत इअरबड्सचा वापर केल्याने कानाच्या आतील त्वचेवर दाब येतो. त्यामुळे त्वचेची जळजळ, खाज, लालसरपणा आणि वेदना जाणवू शकतात. चुकीच्या आकाराचे इअरबड्स वापरल्यास हा त्रास अधिक वाढण्याची शक्यता असते.
मोठ्या आवाजात दीर्घकाळ संगीत ऐकल्यास कानातील नाजूक पेशींवर ताण येतो. यामुळे हळूहळू श्रवणशक्ती कमी होणे किंवा कानात सतत शिट्टीसारखा आवाज (टिनिटस) ऐकू येण्याचा धोका वाढू शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.