Tanot Temple: भारत-पाकिस्तान सीमेवर वसलं असे एक रहस्यमय मंदिर, अनेक हल्ले करूनही आजही जशाचा तसा उभा
मागील काही काळापासून भारत-पाकिस्तान हा मुद्दा फार चर्चेत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराविषयी माहिती सांगत आहोत, जे भारत-पाकिस्तान सीमेवर वसले आहे. हे मंदिर एक रहस्यमयी मंदिर असल्याचे सांगितले जाते, याच्या चमत्काराच्या कहाण्या केवळ स्थानिक लोकांपुरत्याच मर्यदित नसून भारतीय सैन्य देखील त्याची शक्ती आणि वैभव मान्य करते. मंदिराचे नाव तनोट माता मंदिर असे आहे आणि ते या ठिकाणात फार प्रसिद्ध असे मंदिर आहे. चला तर मग या मंदिराविषयी काही रंजक आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
तनोट माता मंदिर कुठे आहे?
तनोट माता मंदिर हे भारत-पाकिस्तान सीमेजवळ, राजस्थानमधील जैसलमेरपासून सुमारे १२० किलोमीटर अंतरावर वसलेले एक रहस्यमय मंदिर आहे. हे मंदिर थार वाळवंटात पसरलेल्या उजाड प्रदेशाच्या मध्यभागी आहे, तिथे पोहोचण्यासाठी पर्यटकांना वाळवंटातून जावे लागते. जैसलमेर-बाडमेर प्रदेशातील चरण समुदायाची कुलदेवता तनोट माता आहे अशी एक लोकप्रिय धारणा आहे. तनोट माता हे हिंगलाज मातेचे एक रूप मानले जाते. हे मंदिर दुर्गा मातेच्या अवताराला समर्पित आहे.
१९६५ च्या युद्धादरम्यान, पाकिस्तानी सैन्याने तनोट परिसरात बॉम्बने जोरदार हल्ला केला. या काळात पाकिस्तानी सैन्याने या मंदिर संकुलावर सुमारे ३,००० बॉम्ब टाकले, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे याचा मंदिरावर कोणताही परिणाम झाला नाही आणि ४५० हून अधिक बॉम्ब फुटलेही नाहीत. यानंतर, १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात, पाकिस्तानी सैन्यानेही या भागात हल्ला केला, परंतु मंदिर पुन्हा जशेच्या तसे सुरक्षित राहिले. भारतीय सैन्य आणि स्थानिक लोक याला तनोट मातेचा आशीर्वाद असल्याचे मानतात. आजही त्या काळातील न फुटलेले बॉम्ब मंदिराच्या परिसरात प्रदर्शित केले आहेत, जे या चमत्काराची साक्ष देतात.
या मंदिराची देखभाल भारतीय सैन्य करते.
१९६५ च्या युद्धापासून, तनोट माता मंदिराचे व्यवस्थापन आणि देखभाल भारतीय सीमा सुरक्षा दल (BSF) द्वारे केली जाते. बीएसएफचे सैनिक येथे देवीची सेवा करतात आणि मंदिर परिसराची सुरक्षा आणि स्वच्छतेची काळजी घेतात. दरवर्षी नवरात्रीनिमित्त येथे एका भव्य मेळाव्याचे आयोजन केले जाते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांचा समावेश दिसून येतो.
भारतातील या ठिकाणी घेता येईल Skydiving चा आनंद; असे साहस जे आयुष्यभर स्मरणात राहील…
मंदिरात जाण्याची वेळ?
तुम्हला या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही सकाळी ६ ते रात्री ८ वाजताच्या सुमारास मंदिराला भेट देऊ शकता. इथे जायचे असल्यास जैसलमेर आणि जोधपूर विमानतळांवरून तनोट माता मंदिराला भेट देता येते. जैसलमेरहून टॅक्सी किंवा खाजगी वाहनाने तनोट माता मंदिरापर्यंत पोहोचता येते. रस्ता चांगल्या स्थितीत आहे आणि वाटेत वाळवंटाचे विहंगम दृश्य पाहता येते.