
सकाळच्या या 5 सवयी किडनीला आतून करतात कमकुवत, तुम्ही तर करत नाही आहात ना ही चूक? वेळीच व्हा सावध!
मागील काही काळापासून किडनी फेलरच्या समस्या अनेकांमध्ये दिसून आल्या आहेत. अशात वेळीच जागृत होऊन आपण आपल्या किडनीचे संरक्षण करायला हवे. किडनी खराब झाली तर शरीरातील नको असलेले घटक शरीराबाहेर पडत नाहीत ज्यामुळे ते आतल्या आतच साठू लागतात. याचा आपल्या आरोग्यावर पुढे जाऊन विपरीत परिणाम घडून येतो. मधुमेह, लठ्ठपणा आणि मद्यपान या कारणांमुळे किडनीचे आजार प्रामुख्याने वाढू लागतात. तथापि यात आपल्या काही वाईट सवयींचाही हातभार आहे. रोजच्या जीवनात सकाळी केलेल्या काही वाईट सवयी आपल्या किडनीला हानी पोहचवत असतात. चला या कोणत्या सवयी आहेत ते जाणून घेऊया.
सकाळी लघवी रोखून ठेवणे
अनेकदा झोपेत असताना आपल्याला लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते पण झोपमोड होऊ नये म्हणून अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. आपली ही सवय किडनीवर वाईट परिणाम करत असते. कोणत्याही वेळी लघवी ही कधीच रोखून ठेवू नये. यामुळे किडनीवर दबाब येतो आणि वारंवार असं केल्याने मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होऊ शकतात, संसर्गाचा धोका वाढू लागतो आणि किडनीच्या टिश्यूंना नुकसान होऊ शकते.
सकाळी पाणी न पिणे
रात्रभर शरीरात काहीही अन्न पाणी नसल्याने सकाळी उठून पाण्याचे सेवन करायला हवे. असं न केल्यास शरीराला डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. सकाळी पाण्याची सर्वात जास्त गरज असते. तथापि, बरेच लोक पाणी पिणे टाळतात आणि चहा किंवा कॉफी पितात, ज्यामध्ये कॅफिन असते जे शरीराला अधिक डिहायड्रेट करते. यामुळे किडनीवर दबाव वाढू शकतो.
रिकाम्या पोटी वेदनाशामक औषधे घेणे
कोणतीही औषधे ही उपाशीपोटी कधीही घेऊ नये. याचा सल्ला डॉक्टरही वारंवार आपल्या रुग्णांना देत असतात. बरेच लोक सकाळी डोकेदुखी किंवा शरीरदुखीसाठी आयबुप्रोफेन आणि अॅस्पिरिन सारखी औषधे घेतात. या औषधांचा जास्त डोस घेतल्याने किंवा उपाशीपोटी यांचे सेवन केल्याने किडनीत जळजळ आणि नुकसान होऊ शकते. हे किडनीचा रक्त प्रवाह कमी करतात, कोणतीही औषधेही ही काही तरी खाल्ल्यानंतर आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावीत.
व्यायामानंतर पाणी न पिणे
सकाळचा व्यायाम आरोग्यासाठी चांगला मानला जातो. परंतु घामामुळे शरीरातील पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात ज्यामुळे व्यायामानंतर पाण्याचे सेवन करायला हवे. अनेकजण व्यायामानंतर पाणी पिणे टाळतात ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होतं, किडनीला रक्तपुरवठा कमी होतो आणि किडनीवर अनावश्यक ताण येऊ लागतो.
नाश्ता वगळणे
सकाळचा नाश्ता आपल्या निरोगी आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो. कामाच्या गडबडीत अनेकजण घाईघाईत सकाळचा नाश्ता करत नाही. मग पुढे दिवसभरात ते चिप्स, चिवडा अशा खारट पदार्थांचे सेवन करतात. अशा पदार्थांचे सेवन शरीरात सोडियम वाढते, जे किडनीसाठी हानिकारक आहे. नाश्ता वगळल्याने रक्तातील साखरेचे असंतुलन होऊ शकते, शरीरात आम्ल वाढू शकते आणि किडनीवर अतिरिक्त कामाचा भार येऊ शकतो.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.