
ब्रेन स्ट्रोकबाबत माहिती (फोटो सौजन्य - iStock)
मेंदूच्या एखाद्या भागाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यामध्ये काही अडथळा आला किंवा रक्तपुरवठा कमी झाला तर ब्रेन स्ट्रोक येतो. धमनीमध्ये किंवा काही दुर्मिळ केसेसमध्ये मेंदूतील रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज निर्माण झाल्यामुळे इस्केमिक स्ट्रोक होतो. मेंदूमध्ये रक्तवाहिनीत बिघाड झाल्याने किंवा ती फुटल्याने होणारा रक्तस्त्राव हे स्ट्रोकचे अजून एक कारण असते. या दोन्ही केसेसमध्ये मेंदूला आवश्यक तितका रक्तपुरवठा आणि पोषकतत्त्वे मिळत नाहीत, त्यामुळे मिनिटभरात रक्तातील पेशी मरण पावू लागतात.
स्ट्रोक ही गंभीर वैद्यकीय स्थिती आहे. त्याकडे तातडीने लक्ष दिले जाणे अत्यंत आवश्यक असते. पण चांगली बाब अशी की निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करून आपण स्ट्रोक होण्याचा धोका कमी करू शकतो. डॉ. अभिजित कुलकर्णी, कन्सल्टंंन्ट, न्यूरोसर्जरी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, नवी मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
आरोग्याला पूरक आहार घेणे
मेंदू निरोगी राखायचा असेल तर संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळी फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये, मेद नसलेली प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स यांचा समावेश असलेला आहार नियमितपणे घेतल्यास स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होऊ शकतो. सोडियमचे (मीठ) सेवन कमी प्रमाणात केल्यास, ट्रान्स फॅट्स टाळल्यास तुमचा रक्तदाब व्यवस्थित राहतो. रक्तदाब वाढणे हे स्ट्रोक होण्याचे एक कारण ठरू शकते.
ब्रेन स्ट्रोक येण्यपूर्वी शरीर देतो काही संकेत… लक्षात येताच घ्या डॉक्टरांची धाव
सक्रिय राहणे
तुमची जीवनशैली जर सक्रिय असेल तर तुम्ही स्ट्रोकला प्रतिबंध घालू शकता. नियमितपणे व्यायाम केल्याने हायपरटेन्शन, मधुमेह आणि स्थूलपणा असे जीवनशैलीमुळे होणारे आजार टाळता येतात, हे आजार स्ट्रोकचा धोका वाढवतात. दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे मध्यम ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम किंवा ७५ मिनिटे जोमदार ते तीव्र स्वरूपाचा व्यायाम करावा, त्याबरोबरीने दर आठवड्याला दोन किंवा त्यापेक्षा जास्त दिवस स्नायू मजबूत करणारे व्यायाम, कामे करावीत.
धूम्रपान बंद करा आणि अल्कोहोलचे सेवन कमी प्रमाणात करा
हे फार महत्त्वाचे आहे. धूम्रपान स्ट्रोकला कारणीभूत ठरते. धुम्रपानामुळे रक्तदाब वाढतो, इतकेच नव्हे तर रक्त घट्ट होते आणि धमन्यांमध्ये प्लाक निर्माण होणे वाढते. धूम्रपान सोडल्याने स्ट्रोकचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. अति प्रमाणात अल्कोहोल सेवन केल्याने रक्तदाब वाढतो, हृदय निकामी होऊ शकते आणि स्ट्रोक देखील येऊ शकतो. अल्कोहोलचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
नियमितपणे आरोग्य तपासणी
नियमितपणे आरोग्य तपासणी करत राहिल्यास, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल आणि मधुमेह यासारख्या समस्या असल्यास त्यांचे लवकरात लवकर निदान करता येते आणि तातडीने उपचार केले जाऊ शकतात. या आजारांवर वेळीच उपचार केल्याने स्ट्रोकचा धोका खूप प्रमाणात कमी होतो.
ब्रेन स्ट्रोकची लक्षणे तसेच त्यावरील उपाय; जाणून घ्या
ताणतणाव कमी करा
खूप जास्त ताणतणाव असतील तर स्ट्रोकचा धोका वाढतो. समाधानी राहणे, ध्यानधारणा, योग आणि दीर्घ श्वसन यासारखी तंत्रे लाभदायक ठरू शकतात. झोप पुरेशी आणि नीट होत नसेल तर रक्तदाब आणि जळजळ यासारखे त्रास होतात, त्यामुळे स्ट्रोकचा धोका अजून वाढतो, त्यामुळे रोजच्या रोज पुरेशी व शांत झोप घेणे महत्त्वाचे आहे.
आजाराला प्रतिबंध घालणे हे त्यावर उपचार करण्यापेक्षा चांगले असते. स्ट्रोकची लक्षणे आणि चिन्हे याबाबत नीट माहिती करून घेतली पाहिजे. स्ट्रोक होत आहे हे जितक्या लवकर समजेल आणि ‘गोल्डन अवधी’ मध्ये वैद्यकीय मदत मिळाली तर मेंदूचे नुकसान कमीत कमी होईल हे सुनिश्चित करून व्यक्ती पूर्णपणे बरी होण्याची शक्यता वाढते.
निरोगी जीवनशैलीचे आचरण करून आणि योग्य माहिती जाणून घेऊन स्ट्रोकचा धोका कमी केला जाऊ शकतो व तुम्ही निरोगी दीर्घायुष्याचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला असलेल्या धोक्यांबाबत तसेच स्ट्रोक कसा टाळता येईल याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी मल्टीडिसिप्लिनरी दृष्टिकोन असणाऱ्या हॉस्पिटलमधील डॉक्टरांशी बोला. जीवनशैलीमध्ये साधे पण प्रभावी बदल घडवून आणून तुम्ही मेंदूच्या आरोग्याचे रक्षण करून अधिक चांगले जीवन जगू शकता.