
Fry Tomato Recipe: जेवणात चटपटीत तडका (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
2 मध्यम आकाराचे टोमॅटो ( टोमॅटो पिकलेले नसावे थोडे कडक घ्यावे)
थोडा कढीपत्ता
अर्धा चमचा जिरे
एक चमचा मिरची पावडर
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
2 चमचे तेल
सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुऊन घ्या. त्याचे गोल-गोल काप करा. खूप पातळ पण नको आणि खूप जाड पण नको, मध्यम कापा. त्यामुळे ते छान तळले जातील.आता गॅसवर तवा ठेवा. तवा चांगला गरम होऊ द्या पण गॅस बारीकच ठेवा. मोठ्या गॅसवर मसाला जळून जाण्याची शक्यता असते. तवा गरम झाला की त्यावर थोडं तेल टाका. तेलात जिरे टाका, ते तडतडले त्यामध्ये कढीपत्ता, हळद, मिरची पावडर आणि मीठ टाका. हे सगळं चमच्याने हलकं हलवून घ्या. मसाला करपणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर कडू लागेल.मसाला तयार झाला की त्यावर एक-एक करून टोमॅटोचे काप ठेवा. एक काप दुसऱ्या कापावर ठेवू नका, सगळे सुटे सुटे ठेवा म्हणजे सगळ्या बाजूने छान तळले जातील.आता बारीक गॅसवर टोमॅटो होऊ द्या. 2-3 मिनिटात टोमॅटोला रंग यायला लागेल. कडेला थोडा खरपूसपणा दिसला की हळूच उलटून घ्या. दुसरी बाजू पण तशीच होऊ द्या. दोन्ही बाजूने लालसर आणि थोडे कुरकुरीत झाले की समजा तुमचा टोमॅटो फ्राय तयार आहे. गॅस बंद करा.
गरम गरम टोमॅटो फ्राय पोळीसोबत खायला एक नंबर लागतो. भाकरी सोबत सुद्धा चांगला लागतो. काही लोक भात आणि वरणा सोबत पण खातात. तोंडी लावायला म्हणून पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे. यात तुम्हाला हवं असेल तर थोडा वेगळा प्रयोग पण करू शकता. वरून थोडी कोथिंबीर टाकली तरी चालेल, किंवा चाट मसाला टाकला तरी चव अजून वाढते.यासाठी वेगळा खर्च नाही. घरात टोमॅटो असतातच. आणि मसाले तर प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतातच.तर मग वाट कसली बघताय? आज संध्याकाळीच ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा. घरात सगळ्यांना नक्की आवडेल.’
(टीप- तिखट तुम्हाला जसं लागतं तसं कमी जास्त करू शकता. लहान मुलांसाठी करत असाल तर मिरची थोडी कमी टाका.)