
photo - yandex
टाइप-1 मधुमेह हा स्वयंप्रतिकार म्हणजेच ऑटोइम्यून प्रकारचा आजार आहे. टाइप १ मधुमेहामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते. त्यामुळे शरीरात इन्सुलिन तयार होणे पूर्णपणे बंद होते. अशा रुग्णांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनची आवश्यकता असते. हा प्रकार प्रामुख्याने लहान मुले, किशोरवयीन किंवा तरुणांमध्ये अधिक आढळतो.
टाइप-2 मधुमेहामध्ये शरीर इन्सुलिन तयार करत असले तरी त्याचा योग्य वापर करू शकत नाही. या स्थितीला इन्सुलिन रेझिस्टन्स असे म्हणतात. वाढते वजन, बैठी जीवनशैली, अयोग्य आहार, आनुवंशिकता आणि वाढते वय ही त्यामागील प्रमुख कारणे मानली जातात. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि आवश्यक औषधांच्या मदतीने हा प्रकार नियंत्रणात ठेवता येतो.
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, टाइप-1 किंवा टाइप-2 यापैकी कोणताही प्रकार कमी किंवा जास्त धोकादायक नाही. खरी समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा रक्तातील साखरेची पातळी दीर्घकाळ नियंत्रणात राहत नाही. टाइप-1 मध्ये इन्सुलिन न घेतल्यास गंभीर जीवघेणा धोका निर्माण होऊ शकतो, तर टाइप-2 अनेक वर्षे कोणतीही ठळक लक्षणे न दाखवता शरीरातील अवयवांना हानी पोहोचवू शकतो.
अनियंत्रित मधुमेहामुळे डोळे, मूत्रपिंड, हृदय, मेंदू आणि मज्जातंतूंवर गंभीर परिणाम होऊ शकतो. याशिवाय जखमा उशिरा भरून येणे, वारंवार संसर्ग होणे आणि हृदयविकाराचा धोका वाढणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे नियमित तपासणी आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत.
संतुलित आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रणात ठेवणे, रक्तातील साखरेची वेळोवेळी तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे किंवा इन्सुलिन घेणे हे मधुमेह नियंत्रणाचे प्रभावी उपाय आहेत. तसेच धूम्रपान, मद्यपान आणि अति साखरयुक्त पदार्थांचे सेवन टाळल्यास आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
मधुमेहाचा कोणताही प्रकार असो, त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. योग्य वेळी निदान, नियमित उपचार आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब केल्यास मधुमेहामुळे होणाऱ्या गंभीर परिणाम टाळणे शक्य आहे.
दररोजच्या ‘या’ सवयी किडनी आणि लिव्हरसाठी ठरू शकतात घातक; वेळेत बदला जीवनशैली