
हिवाळ्यात शरीराला गरम ठेवतात हे पदार्थ, नियमित सेवन करा... रात्री ब्लँकेट घेण्याचीही गरज भासणार नाही
तूप
जुन्या काळापासून भारतीय स्वयंपाकघरात तुपाचा वापर केला जातो. तूप फक्त पदार्थाची चव वाढवत नाही तर यातील फॅटी अॅसिड शरीराला नैसर्गिकरित्या उबदार ठेवण्यास मदत करते. रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही एक चमचा तूप कोमट दुधात मिसळून पिऊ शकता. याचप्रमाणे भात शिजवताना त्यात चमचाभर तूप टाकून किंवा चपातीवर तूप पसरवून तुम्ही त्याचे सेवन करू शकता. डाळीत टाकला जाणारा तडक देखील तुपात फार खमंग बनतो. तुपाचे सेवन सांधे मजबूत करण्यासही मदत करतात. याचे सेवन शरीरातील मेटाबॉलिजम वाढवते.
नट्स आणि सीड्स
हिवाळ्यात तुमचे शरीर उबदार ठेवण्यासाठी नट्स आणि सीड्सचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायद्याचे ठरू शकते. थंडीच्या काळात बदाम, अक्रोड, तीळ आणि अळशीचे बियाणे खाणे खूप फायदेशीर आहे. या काजूमध्ये असलेले प्रथिने आणि फॅटी ॲसिड शरीराला उबदार ठेवण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
मध
हिवाळ्यात मध खाण्याचे अनेक फायदे आहेत, जसे की रोगप्रतिकारशक्ती वाढवणे, सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवणे आणि पचन सुधारणे. मधातील जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. थंडीत याचे सेवन शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करते.
गूळ
थंडीत बहुतेक घरात गोडसर आणि हेल्दी लाडू तयार केले जातात. मग ते मेथीचे लाडू असोत वा डिंकाचे… या लाडवांमध्ये गुळाचा प्रामुख्याने वापर केला जातो. पारंपरिकरित्या फार आधीपासून बहुतेक गोड पदार्थांमध्ये गुळाचा वापर केला जातो. याचे सेवन थंडीत शरीराला उबदारपणा मिळवून देण्यास मदत करतो. झोपण्यापूर्वी ते खाल्ल्याने शरीराचे तापमान राखण्यास मदत होते. ते पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते आणि सर्दी आणि फ्लू सारख्या हंगामी आजारांपासून शरीराचे संरक्षण करते.
काही मसाले देखील फायदेशीर
स्वयंपाकघरातील काही मसाले केवळ चव वाढवत नाहीत तर अनेक आरोग्य समस्या देखील दूर करतात. हिवाळ्यात लवंग, काळी मिरी आणि दालचिनी सारखे मसाले खाल्ल्याने शरीर नैसर्गिकरित्या उबदार राहते आणि पचनसंस्था आणि रक्ताभिसरण सुधारण्यास याची फार मदत होते.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.