गर्भपातानंतर का वाढते वजन, जाणून घ्या (फोटो सौजन्य - iStock)
गर्भधारणेदरम्यान शरीरात इस्ट्रोजेन (Estrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) हे हार्मोन्स. मोठ्या प्रमाण प्रमाणात वाढतात. गर्भपातानंतर हे हार्मोन्स अचानक कमी होतात. या बदलामुळे शरीराचा मेटाबॉलिझम मंदावतो, भूक वाढते आणि शरीरात पाणी साठवून ठेवण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे वजन वाढू शकते. डॉ. केकिन गाला, स्त्रीरोग तज्ज्ञ, अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालय मुंबई यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
काय होतो परिणाम
बऱ्याच महिलांना काही वेळा व्यायाम करूनही वजन कमी करता येत नाही. गर्भपातानंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या मोठ्या हार्मोनल बदलांमुळे असे घडते. गर्भपात हा अतिशय कठीण आणि वेदनादायक अनुभव असतो आणि त्यामुळे गंभीर नैराश्यही येऊ शकते.
कॉर्टिसोल (Cortisol) सारखा ‘स्ट्रेस हार्मोन’ देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. गर्भपातानंतर महिलांमध्ये मानसिक ताण,चिंता आणि नैराश्य येते. यामुळे कॉर्टिसोलचे प्रमाण वाढते आणि शरीरात चरबी साठण्याची प्रक्रिया वेगाने होते. विशेषतः पोटाभोवती चरबी साठून राहण्याचे प्रमाण वाढते.
अनेक महिलांमध्ये गर्भपातानंतर थकवा येणे, शारीरिकदृष्ट्या कमकुवतपणा आणि मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम झाल्साचे दिसून येते. त्यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि आहाराच्या चुकीच्या सवयी जडतात . काही जणी ‘emotional eating’ म्हणजेच भावनिक तणावामुळे जास्त खातात, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.
कशी काळजी घ्याल?
गर्भपातानंतर शरीर आणि मन दोन्हींची काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वात आधा तुमच्या शरीराला विश्रांती देणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने हलका व्यायाम करा जसे की चालणे, योगासन करणे. संतुलित आहाराचे सेवन करणे गरजेचे आहे. प्रथिनं, फळे, भाज्या, आणि तृणधान्य यांचा आहारात समावेश करावा. जंक फूड आणि शर्करायुक्त पदार्थ टाळा. भरपूर पाणी प्या ज्यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास मदत होईल.
मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कुटुंबीयांशी संवाद साधणे, समुपदेशन (counseling) घेणे किंवा ध्यान-प्राणायाम करणे यामुळे ताण कमी होतो. योग्य झोप देखील हार्मोनल संतुलनासाठी गरजेची आहे. तज्ज्ञांच्या मते, गर्भपातानंतर वजन वाढणे ही एक सामान्य बाब असली तरी योग्य काळजी घेतल्यास ते नियंत्रणात ठेवता येते. त्यामुळे स्वतःवर संयम ठेवून हळूहळू आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारणे गरजेचे आहे.
गर्भपात झाल्यानंतर किती दिवसांनी मासिक पाळी येते? डॉक्टर काय सांगतात






