Photo Credit : Social Media
अमेरिका : अमेरिकेत स्वत:हून गर्भपात करणाऱ्या महिलांची संख्या झपाट्याने वाढली आहे. दोन वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या गर्भपात बंदी कायद्यामुळे या महिलांना घरीच गर्भपात करण्याची वेळ ओढावली आहे. घरीच गर्भपात करण्याने कधी कधी परिस्थिती इतकी बिघडते की महिलांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येते. अमेरिकेत नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून घरीच गर्भपात करणाऱ्या महिलांची संख्या लाखात असू शकते, अशी माहिती समोर आली आहे.
जामा नेटवर्क ओपन जर्नल, अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या मासिकाच्या वतीने गेल्या मंगळवारी एका सर्वेक्षणाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपातावर बंदी घातली आणि राज्यांना स्वतःच्या कायद्यात बदल करण्याचे स्वातंत्र्य दिले. तेव्हापासून मोठा बदल झाला आहे. गर्भपातावर बंदी घालण्यात आली असली तरीही गर्भपात होतच आहेत आणि गेल्या दोेन वर्षात गर्भपाताची प्रकरणेही झपाट्याने वाढली आहेत.
संशोधकांनी सर्वेक्षणाच्या पहिल्या सहा महिन्यांत 7 हजार महिलांच्या गटांशी चर्चा केली, तर एक वर्षानंतर पुन्हा 7 हजार महिलांशी चर्चा करण्यात आली. यात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महिलांनी घरीच गर्भपात करण्याची वेळ आल्याचे त्यांनी कबूल केले. हे संशोधन एका छोट्या गटावर करण्यात आले असले तरी अशा महिलांची संख्या लाखात असू शकते, असा अंदाज संशोधकांनी वर्तवला आहे.
जून 2022 मध्ये, यूएस सर्वोच्च न्यायालयाने गर्भपात मंजूर करणारा सुमारे पाच दशके जुना निर्णय रद्द केला. याआधीही 13 राज्यांनी गर्भपात विरोधी कायदे केले होते पण ते तितकेसे तसे कठोर नव्हते. अडचण आली तरी महिला इतर राज्यांतील हॉस्पिटलमध्ये जात असत. पण दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयाने सगळेच बदलले. गर्भपाताला नैतिक आणि धार्मिकदृष्ट्या चुकीचे ठरवत न्यायालयाने राज्यांना हवे तसे गर्भपातविरोधी कायदे कडक करण्याचे अधिकार दिले.
न्यायालयाचा निर्णय जाहीर होताच गर्भपात दवाखाने बंद होऊ लागले. अगदी नियोजित गर्भपातही रद्द करण्यात आले. यानंतर परिस्थिती अधिकच बिघडत गेली. आता परिस्थिती अशी आहे की, नको असलेली गर्भधारणा झाल्यास महिलांना घरच्या घरी गर्भपात करणे भाग पडते.
अत्यंत आधुनिक म्हटल्या जाणाऱ्या यूएसएमध्ये गर्भपातावर बराच काळ वादविवाद सुरू आहेत. हा महिलांचा अधिकार आहे, न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करू नये, असे बहुतांश लोकांचे म्हणणे आहे. तर 40 टक्के लोक गर्भपातविरोध योग्य असल्याचे मानतात. गार्डियनच्या अहवालानुसार, सुमारे 85 टक्के लोकांनी काही विशिष्ट परिस्थितीत गर्भपात पूर्णपणे न्याय्य मानला.
अमेरिकेच्या निवडणुकीतही हा मोठा मुद्दा मानला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गर्भपातविरोधाचे समर्थन करत आहेत. तर राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवार कमला हॅरिससह त्यांचा पक्ष हा कायदा हटवू इच्छित आहे. नोव्हेंबरमध्ये होणारा विजय-पराजयही यावरच ठरेल, असे मानले जात आहे.
19व्या शतकात अमेरिकेत सामान्य कायद्यानुसार गर्भपाताला परवानगी होती. पण ज्यावेळी गर्भात हालचाली दिसू लागतील तेव्हा या गर्भपाताला मनाई होती. कॅथोलिक चर्चचा असाही विश्वास होता. गर्भपाताच्या विरोधात कायदा आणण्यात चर्चने मोठी भूमिका बजावली आहे.
यामागे धार्मिक, राजकीय आणि सामाजिक कारणे होती. कॅथोलिक धार्मिक श्रद्धेनुसार गर्भपात हा चुकीचा असल्याते मानतात. त्याच वेळी, अनेक गर्भपात विरोधी कार्यकर्ते याला जगण्याचा हक्क म्हणून पाहतात आणि याला न जन्मलेल्या मुलाविरुद्धचे षड्यंत्र मानले जाते. अमेरिकेतील पुराणमतवादी पक्षांच्या नेत्यांचाही यात सहभाग होता.






