
थंडीत सांध्यांमध्ये वेदना का होतात? नियमित फॉलो करा 'या' सवयी
राज्यासह संपूर्ण देशभरात हलकीशी थंडी जाणवू लागली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा असतो. थंडगार वातावरणात बाहेर फिरण्याची आणि गरमागरम पदार्थ चाखण्याची मजा घेतली जाते. पण थंडीच्या दिवसांमध्ये हाडांसंबंधित समस्या मोठ्या प्रमाणावर उद्भवू लागतात. अगदी तरुण वयातील मुलामुलींपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांची हाडे कायमच दुखतात.गुडघे, मनगट, कंबर इत्यादी अवयवांमध्ये वेदना वाढल्यानंतर काहीवेळा त्या अतिशय तीव्र होऊन जातात. संधिवात, जुनाट वेदना किंवा स्नायूंच्या त्रासामुळे संपूर्ण शरीराच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिवाळ्यात सांध्यांमध्ये वेदना का वाढतात? सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – istock)
थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. रक्तभसिरणात अडथळे निर्माण झाल्यानंतर हाडे दुखणे किंवा कंबर दुखणे इत्यादी समस्या वाढून आरोग्य बिघडते. सांध्यांपर्यंत आवश्यक प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यामुळे स्नायू, लिगामेंट्स आणि जोडणारे ऊतक घट्ट आणि ताठर होऊन जातात. वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिक स्नेहन द्रव म्हणजेच joint fluid घट्ट होऊन जाते. ज्यामुळे सांध्यांच्या हालचाली व्यवस्थित होत नाहीत. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये लोक शारीरिक हालचाली खूप कमी करतात. यामुळे हाडे कमकुवत होऊन हाडांमध्ये वेदना वाढतात.
थंडीच्या दिवसांमध्ये हाडांमध्ये वेदना वाढण्यास अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. शरीराचे रक्तभिसरण कमी होणे, स्नायूं ताठ होणे, पाण्याचे प्रमाण कमी होणे इत्यादी गोष्टींमध्ये हाडांमध्ये वेदना वाढण्याची जास्त शक्यता असते. हिवाळ्यात हाडांची झीज झाल्यामुळे गुडघे आणि कंबरमध्ये असह्य वेदना होतात. त्यामुळे थंडीच्या दिवसांमध्ये अंगावर चादर घेऊन झोपणे, गरम पाण्याची अंघोळ करणे, सकाळी उठल्यानंतर हलकासा व्यायाम करणे इत्यादी गोष्टी केल्यास हाडांच्या वेदनांपासून आराम मिळेल. तसेच आहारात बदल करून शरीराची काळजी घ्यावी.
हिवाळ्यात आहारात बदल करून उष्ण पदार्थांचे सेवन करावे. दूध, दही, तीळ, बदाम इत्यादी कॅल्शियम युक्त पदार्थांचे सेवन केल्यास हाडांमध्ये वाढलेल्या वेदना कमी होतील. थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला कॅल्शियमची जास्त आवश्यकता असते. कॅल्शियमची पातळी कमी झाल्यानंतर आरोग्य बिघडते. तसेच थंडीच्या दिवसांमध्ये खूप कमी तहान लागते. त्यामुळे भरपूर पाण्याचे सेवन करावे. पाण्याच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहते आणि स्नायूंमधील वेदना कमी होऊन जातात.
हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यावी?
हिवाळ्यात सर्दी, खोकला आणि कफ यांसारख्या समस्या सामान्य असतात, त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
हिवाळ्यात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी?
हिवाळ्यात प्रवास करताना आजारी पडण्याची शक्यता असते, त्यामुळे खालील गोष्टी बॅगमध्ये ठेवा. आवश्यक गरम कपडे आणि थर्मल वेअर.त्वचेसाठी मॉइश्चरायझर, कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते.सर्दी, खोकला यांसारख्या सामान्य आजारांवरची औषधे.गरम पाणी ठेवण्यासाठी एक थर्मस.