
Workout and Heart Health: वर्कआऊट फायदेशीर, ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)
बराच काळ व्यायाम केला नसेल तर पहिल्याच दिवशी स्वतःची क्षमता तपासण्यासाठी कठीण वर्कआऊट करण्याची गरज नाही. सुरुवात साध्या व्यायामाने करता येते. काही वेळ चालणे, हलकी स्ट्रेचिंग करणे किंवा सोपा व्यायाम करणे हा चांगला पर्याय असू शकतो. हळूहळू वेळ आणि व्यायामाची पातळी वाढवणे योग्य ठरते. अचानक शरीरावर मोठा ताण दिल्यास हृदयाचे ठोके आणि रक्तदाब झपाट्याने बदलू शकतात. त्यामुळे उत्साहाच्या भरात स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे टाळावे.
जिममध्ये पोहोचल्यानंतर लगेच मुख्य वर्कआऊटला सुरुवात करण्याची सवय काही लोकांना असते. मात्र व्यायामाआधी शरीर तयार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही मिनिटे हलकी हालचाल किंवा वॉर्म-अप करता येतो. यामुळे शरीराला व्यायामासाठी तयार होण्यास मदत होते. त्याचप्रमाणे व्यायाम संपल्यानंतरही अचानक सर्व हालचाल थांबवण्याऐवजी काही वेळ शरीराचा वेग हळूहळू कमी करणे चांगले.
जड वजन उचलताना काही जण नकळत श्वास रोखून धरतात. ही सवय योग्य नाही. वजन उचलताना प्रशिक्षकाने सांगितलेल्या पद्धतीने श्वास घेणे आणि सोडणे आवश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यास शरीरावर अनावश्यक दबाव येऊ शकतो. फक्त जास्त वजन उचलले म्हणजे वर्कआऊट चांगला झाला असे नाही. योग्य पद्धत, योग्य वजन आणि शरीराची क्षमता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
ज्यांना आधीपासून हृदयाशी संबंधित समस्या आहेत किंवा रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांनी व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. त्याचप्रमाणे बराच काळ व्यायाम न केलेल्या व्यक्तींनीही सुरुवात करताना घाई करू नये. विशेषतः नवशिक्यांनी सोशल मीडियावर पाहिलेला कठीण वर्कआऊट तसाच करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या शरीराला जमेल अशा व्यायामापासून सुरुवात करावी.
वर्कआऊट करताना नेहमीचा थकवा जाणवणे वेगळे आणि अस्वस्थ करणारी लक्षणे दिसणे वेगळे. व्यायाम करताना छातीत दुखणे किंवा दडपण जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, अचानक चक्कर येणे, खूप अशक्त वाटणे किंवा असामान्यपणे जास्त घाम येणे अशी लक्षणे दिसली तर व्यायाम सुरू ठेवू नये. अशा वेळी विश्रांती घेऊन तातडीने वैद्यकीय मदत घेणे महत्त्वाचे आहे. हृदयाचे ठोके नेहमीपेक्षा खूप वेगाने जाणवत असतील किंवा शरीर अचानक साथ देत नसल्यास त्याकडेही दुर्लक्ष करू नये.
Pregnancy Problem: लग्नानंतर 5 वर्ष मूल नाही, रिपोर्टही नॉर्मल; 1 टेस्ट आणि धक्कादायक बाब समोर