डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४
कल्याण : मंत्री रविंद्र चव्हाण यांचा माध्यमातून डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने डोंबिवलीकरांसाठी आरोग्य आणि मैत्री दिनाची सांगड घालत ४ ऑगस्ट २०२४ रोजी कल्याण डोंबिवलीमधील सर्वात मोठ्या “डोंबिवलीकर फ्रेंडशिप रन २०२४” चे आयोजन करण्यात आले आहे. चालणे, धावणे किंवा पळणे ही आरोग्यदायी जीवनाची गुरुकिल्ली आहे. धकाधकीच्या शहरी वातावरणात आपल्या शरीराला व्यायाम अत्यावश्यक आहेच असं आरोग्यविज्ञान सांगते आणि त्यासाठी चालणे, धावणे किंवा पळणे यापेक्षा उत्तम काहीच नाही आणि हाच मूलमंत्र रुजवण्यासाठी नामदार रविंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे.
१.६ किमीचा फन रन हे या कार्यक्रमाचं आकर्षण असणार आहे. जेथे ६ वर्षांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असेल. नामदार रविंद्र चव्हाण आणि कल्याण डोंबिवली रनर ग्रुप तर्फे शाळा, कॉलेज, सामाजिक संस्था इत्यादींनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक नागरिकांसाठी हा एक अविस्मरणीय अनुभव ठरावा यासाठी कल्याण डोंबिवली रनर ग्रुप प्रयत्नशील आहे. कल्याण डोंबिवली रनर ग्रुप ५०० मॅरॅथॉनर्स असलेली संस्था गेली ९ वर्ष डोंबिवली कल्याणमध्ये धावण्याची संस्कृती रुजावी आणि वाढीस लागावी यासाठी प्रेरणादायी कार्य करत आहे.
डोंबिवली हे संस्कृतीक शहर तर आहेच पण या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना तंदुरुस्त बनविण्यासाठी असे उपक्रम आवश्यक असल्याचे मत मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. दिवाळी पहाट आणि गुढी पाडवा स्वागत यात्रा यांसारख्या आकर्षक कार्यक्रमांसाठी ओळखले जाणारे हे शहर आता डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनच्या माध्यमातून पण ओळखले जावे यासाठी या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे. ज्यामुळे डोंबिवली हे फिटनेस उपक्रमांचे केंद्र बनेल याची आम्ही आशा बाळगून आहोत, असे चव्हाण यांनी नमूद केले. डोंबिवलीकर फ्रेंडशिप रनमधील सहभागींना नामदार रविंद्र चव्हाण आणि सेलिब्रेटी रनर्स भेटण्याची आणि त्यांच्यासोबत धावण्याची संधी मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त स्पर्धा नसून आरोग्य आणि मैत्रीचा उत्सव असणार आहे. सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला इ प्रमाणपत्र आणि सहभाग पदक मिळणार आहे.
ही धाव अशा उत्साही लोकांसाठी आहे ज्यांनी नुकताच धावण्याचा प्रवास सुरू केला आहे आणि त्यांना भविष्यात १० हजार मीटर आणि 21 हजार मीटर सारख्या शर्यतींमध्ये दीर्घकाळापर्यंत प्रगती करायची आहे. त्या सर्वांना शर्यत पूर्ण झाल्यावर पदक आणि ई-प्रमाणपत्र मिळणार आहे.
रनिंग इव्हेंटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव घेण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसह ही रन मजेदार रन असेल आणि पूर्ण झाल्यानंतर त्यांना सहभाग ई-सर्टिफिकेट मिळेल.
या दोन श्रेणी कालबध्द शर्यती (timed races) आयोजित केल्या आहेत आणि भारतातील सर्व प्रमुख धावण्याच्या इव्हेंटसाठी पात्रता म्हणून प्रमाणित केल्या जातील. अंतर पूर्ण करणाऱ्या सर्व नोंदणीकृत सहभागींना स्पर्धा पूर्णत्वाचे ई-प्रमाणपत्र आणि पदक मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.