File Photo : Suicide
वर्धा : इंग्रजीचा पेपर चांगला न गेल्याने मानसिक दडपण आले व त्या स्थितीत बारावीच्या विद्यार्थ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना खरांगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पवनूर येथे घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. वैष्णवी पुंडलिक बावणे (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.
आठवड्यापूर्वी सेलू येथेही बारावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी बावणे ही वर्धा येथील जे.बी. सायन्स कॉलेजमध्ये शिकत होती. बारावी बोर्डाची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. इंग्रजीचा पहिला पेपर सोडवल्यानंतर वैष्णवी चिंतेत दिसत होती. शनिवारी ती तिच्या लहान बहिणीसोबत शेतात गेली होती. इथून परत आल्यानंतर सायंकाळी तिने घरी विष घेतले.
घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी तिला आंजी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. तेथून तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात ‘रेफर’ करण्यात आले. तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी वैष्णवीला तपासणी करून मृत घोषित केले. इंग्रजीचा पेपर बरोबर गेला नसल्यामुळे मानसिक दबावाखाली तिने हे पाऊल उचलले.