पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेत इन्कमिंग सुरूच; 'या' बड्या नेत्यांनी केला प्रवेश
पुणे : आगामी स्थानिक स्वराज संस्था आणि महापालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनेक पक्ष हे तयारीला लागले आहेत. सध्या विरोधी पक्षातून अनेक माजी नगरसेवक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते हे सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहेत. त्यातच आता शिवसेनेने पुण्यात पक्षाची ताकद वाढविण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. अशातच आता भाजपमध्ये इच्छुकांची संख्या सर्वाधिक असताना, सलग आठ वर्षे भाजपमध्ये काम केलेले नितीन पायगुडे यांनी आता शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. तर दुसरीकडे, मनसे-उद्धव ठाकरे युतीबाबत चर्चा सुरू असतानाच, मनसेचे आक्रमक कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे रणजित ढगे पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांचा प्रवेश मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला आहे.
नितीन पायगुडे कोण आहेत?
नितीन पायगुडे यांनी गेली आठ वर्षे भाजपासाठी विविध पातळीवर काम केले आहे. सोशल मीडिया सेल, आर्थिक स्रोत, आंदोलनांची आखणी, इव्हेंट मॅनेजमेंट अशी अनेक कामे त्यांनी हाताळली आहेत. समाजात सुशिक्षित आणि सभ्य अशी त्यांची प्रतिमा आहे. ते प्रभाग क्र. 37 मधून इच्छुक असून, तिथे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत. त्यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
हे सुद्धा वाचा : 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या RSS ने आता गांधी विचार स्विकारावा; काँग्रेसचे आवाहन
कोण आहेत रणजित ढगे पाटील?
मनसेत विद्यार्थी संघटनांतर्गत काम करताना रणजित ढगे पाटील आक्रमक कार्यकर्ता म्हणून ओळखले जात होते. 2016 मध्ये चांदणी चौक टोलनाका फोडल्याप्रकरणी त्यांना जेलही झाली होती. त्यापूर्वी, 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या एका नेत्याने राज ठाकरे यांच्या गाडीवर दगडफेक केली होती. त्याच्या विरोधात पुण्यातील हिराबाग येथील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडण्यात आले होते. आक्रमक भूमिकेबरोबरच त्यांनी सामाजिक कामही केले. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करून त्यांनी शिंदे गटाचा झेंडा हातात घेतला आहे. रणजित ढगे पाटील हे प्रभाग क्र. 25 मधून इच्छुक असून, या प्रभागात पूर्वी चार नगरसेवक भाजपचे होते. हेमंत रासने आमदार झाले, तर माजी आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले आहे. त्यामुळे युती झाल्यास राजेंद्र ढगे पाटील यांना फायदाच होण्याची शक्यता आहे.