समितीने पुढे म्हटले आहे की, राज्यभरात सध्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि नागरिकांवर ओढवलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटात विद्यार्थ्यांना जास्तीचे शुल्क भरण्यास भाग पाडणे अमानवीय ठरेल. या वाढीव शुल्काचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी ठाम मागणी निवेदनात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या अडचणींचा विचार करून विद्यापीठ प्रशासनाने त्वरित निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडावी, अन्यथा संघर्ष तीव्र करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा शुल्कात २० टक्क्यांनी वाढ
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, यावेळी विद्यापीठाने परीक्षा शुल्कात तब्बल २० टक्क्यांची वाढ जाहीर केली असून विद्यार्थ्यांवर याचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. यासंदर्भात विद्यापीठाने अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाने यापूर्वी २०२८ ते २०२० दरम्यान १५ टक्के शुल्क वाढ करण्यास मान्यता दिली होती. तथापि, कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांवरील भार लक्षात घेऊन ही वाढ अंमलात आणली गेली नव्हती. त्यामुळे जवळपास सात वर्षांपासून परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आलेली नव्हती.
पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात भरती! पुणेकरांनो… संधीचा फायदा
दरम्यान, २०२३- २४ आणि २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. यामुळे परीक्षा पद्धतीत व विषयांच्या संख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात ५५ टक्क्यांची शुल्कवाढ करण्याची गरज असल्याचे विद्यापीठाने नमूद केले असले तरी, सध्यातरी केवळ २० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय परीक्षा शुल्क भरण्याच्या प्रक्रियेतही बदल करण्यात आला आहे. यापुढे विद्यार्थी थेट विद्यापीठाच्या बँक खात्यात शुल्क भरतील. नंतर विद्यापीठ विद्यार्थ्यांकडून जमा झालेल्या एकूण रकमेतून संबंधित महाविद्यालयाचा हिस्सा देणार आहे. यामुळे शुल्क प्रक्रियेत पारदर्शकता येईल, असा दावा विद्यापीठाकडून करण्यात आला आहे.