यवत : यवत गावच्या हद्दीत पुणे सोलापूर रस्त्यावर एसटी बसमधील प्रवाशाच्या बॅगमधील २४ लाख ३२ हजार रुपयांची रोकड दोघा अनोळखी चोरटयांनी लुटून नेल्याची माहिती पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. याबाबत प्रज्योत रमेश शिंदे ( खाजगी क्युरियर सर्व्हिस) यांनी यवत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी इंदापूर -स्वारगेट एसटी बसमधून प्रवास करीत होते. यवत हद्दीत त्यांच्या जवळ काही तरुण आले. त्यामधील काळे जर्किंग घातलेल्या तरुणाने ‘मुलींचे केस कापतोस काय’, असे म्हणत शिंदे यांना हाताने व लाथाबुक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अन्य चोरट्याने शिंदे यांचा बॅगवरील हातावर ठोका मारून जबरदस्तीने बॅगमधील पैशाचे पार्सल हिसकावून बसमधून उतरून पळून गेले.
[read_also content=”मामाचा डब्बा घेऊन जाताना तरुणाचा अपघाती मृत्यू https://www.navarashtra.com/maharashtra/accidental-death-of-youth-while-carrying-uncles-box-nrdm-333623.html”]
दरम्यान, मारहाण होताना कोणीही शिंदे यांना सोडवले नाही. पार्सलमधल्या रकमेचा हिशेब करून कुरिअर कंपनीचे मालक प्रशांत काटे हे मुंबईवरून यवतला आले. त्यानंतर खातरजमा करून फिर्याद देण्यात आली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश मदने करीत आहेत.