मतमोजणीनिमित्त पुणे शहरात कडेकोट बंदोबस्त; तब्बल हजारो पोलीस असणार तैनात
पुणे : विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला असून, ३ हजार पोलिसांचा फौजफाटा ठेवण्यात आला आहे. शहरात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, कसबा, वडगाव शेरी, हडपसर, कॉन्टेमेंट तसेच खडकवासला या आठ मतदारसंघाची निवडणूकीची मतमोजणी होणार आहे. कोरेगाव पार्क येथील एफसीआय गोडाऊन येथे सकाळी आठपासून मतमोजणी सुरू होत आहे. पुणे पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदानाचा दिवस देखील शांततेत पार पडला. दरम्यान, उद्या मतमोजणी होत आहे. यानिमित्ताने शहरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यासोबतच काही सूचना देखील पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहेत.
असा आहे बंदोबस्त
अप्पर पोलीस आयुक्त– ४
पोलीस उपायुक्त- ११
सहाय्यक आयुक्त- १९
पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक व उपनिरीक्षक- ३५०
पोलीस अंमलदार- २५०
केंद्रीय सशस्त्र पोलीस बल- १२ कंपनी
राज्य राखीव पोलीस बल- २ कंपनी
प्रतिबंधात्मक आदेश…
मतमोजणीच्या २०० मिटर परिसरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे तसेच ज्वलनशील पदार्थ किंवा हत्यारे घेऊन जाण्यास व बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासोबत फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी मनाई असणार आहे. तर, ५ किंवा त्या पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊन बेकायदेशी जमाव जमवू नये, असेही आदेशात म्हंटले आहे.
मतदान मोजणी परिसर नो-पार्किंग झोन
मतमोजणीनिमित्ताने केंद्रासमोरील साऊथ मेन रोडवर पुर्वेस लेन नं. ५ तसेच जक्शन पश्चिमेस ले नं. २ जंक्शनपर्यंत आणि लेन नंबर ३ व ४ वर २०० मीटरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना नो पार्किंग झोन करण्यात आला आहे.
हे सुद्धा वाचा : पुण्यात टोळक्याची दहशत, वाहनांची तोडफोड; कोयते उगारले अन्…
वाहतूक बंद रस्ते
– डॉन बॉक्सो युवा केंद्रापासून पुणे साऊथ मेन रोड हा मतमोजणीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत वाहतूकीस बंद असणार आहे.
– सेंट मीरा कॉलेज व अतुरपार्क सोसायटीकडून साऊथ मेन रोडकडे जाणाऱ्या वाहनांना लेन नं. १ प्रवेश बंद असणार आहे.
– लेन नं. ५, ६ व ७ साऊथ मेन रोड व येणाऱ्या वाहनांना लेन नं. ४ हा वाहनांना बंद असणार आहे. सदर वाहनांनी उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे.
– लेन नं. २ वर प्लॉट नं.-३८ जैन प्रॉपर्टी येथे व लेन नं. ३ वर बंगला नं. ३७ व ३८ येथे साऊथ मेन रोडवर येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.