संग्रहित फोटो
पुणे : वानवडी परिसरातील भैरोबानाला येथे कोयतेधारी टोळक्याने भरदुपारी दहशत माजवत वाहनांची तोडफोड करून धुडगूस घातला आहे. टोळक्याने कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकी अशा नऊ वाहनांची तोडफोड केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयुर उत्तम गायकवाड (वय ३२, रा. चिमटा वस्ती, भैरोबानाला पुणे-सोलापूर रस्ता, वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भैरोबानाला परिसरातील सेंट पॅट्रीक चर्चजवळ चिमटा वस्ती आहे. गुरुवारी भरदुपारी टोळके वस्तीत आले. त्यांच्याकडे कोयते आणि दांडके होते. त्यांनी कोयते आणि दांडके उगारुन दहशत माजवण्यास सुरूवात केली. नंतर पार्क केलेल्या कार, रिक्षा, टेम्पो, दुचाकींची तोडफोड करुन टोळक्याने धुडगूस घातला. तसेच, रहिवाशांना शिवीगाळ देखील केली. तेव्हा मयूर गायकवाड हे घरातून बाहेर आले असता त्यांनाही या टोळक्याने शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. कोणी मध्ये पडले तर त्याला जिवे मारु’, अशी धमकी दिली. त्यानंतर टोळके तेथून निघून गेले. त्यांनी जाताना कालव्याजवळ लावलेली दुचाकी व रिक्षाचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहायक फौजदार कुंभार तपास करत आहेत. पसार झालेल्या टोळक्याच्या शोध घेण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : ऐन निवडणूकीच्या धामधूमीत ३ बोकड अन् १ शेळी चोरीला; आजींची पोलीस ठाण्यात धाव
निवडणूका पार पडताच गुन्हेगारीला उत
गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकांचा माहोल शहरात होता. परिणामी गुन्हेगारी कारवाया काही प्रमाणात कमी झाल्याचे जानवते. परंतु, आता मतदान होऊन दिवस होत नसतानाच पुन्हा शहरात गुन्हेगारांनी पुन्हा मुंडके वर काढले आहे. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यातील पहिली घटना वानवडी भागात वाहन तोडफोडीची घडल्याचे दिसत आहे. तर, मुंढव्यात खूनाचा प्रयत्न झाला आहे.
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.