
अकोला जिल्ह्यात 42 अतिरिक्त, तरी 15 शाळा एकशिक्षकी; अनेक शाळांची अवस्था तशीच...
अकोला जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेच्या एकूण ९५० शाळा आहेत. त्यातील प्राथमिक शाळा ९२० शाळा, ३० शाळा माध्यमिक आहेत. ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या टिकवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात असताना अकोला जिल्ह्यात एक वेगळेच चित्र समोर आले आहे. जिल्ह्यात ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत असतानाही तब्बल १५ शाळा अद्याप एक शिक्षकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त होत आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद शाळांमध्ये पूर्वी शिक्षकांची कमतरता हा नेहमीच चर्चेचा विषय होता. मात्र, आता परिस्थिती बदलली असून, विद्यार्थ्यांची संख्या घटल्याने काही शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. जिल्ह्यातील ९५० शाळांमध्ये एकूण ५५ हजार विद्यार्थ्यांची पटसंख्या आहे. मंजूर शिक्षक पदांची संख्या ३ हजार ४२ असून, प्रत्यक्षात ३ हजार शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत ४२ शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत.
…तर शाळेच्या पटसंख्येत भर पडणार
खाजगी शाळांसारखे शिक्षण जिल्हा परिषेद शाळेत मिळाले, तर शाळेच्या पटसंख्येत भर पडणार आहे. आणि जिल्हा परिषदेत शिकलेला विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत टिकणार. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेत विषयानुसार शिक्षक असणे आवश्यक आहे.
शिक्षण पद्धतीवर बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक
जिल्हा परिषद शाळेत शिकलेला विद्यार्थी खाजगी विद्यार्थ्यांच्या शर्यतीत टिकण्यासाठी संबंधित शाळेतील शिक्षकांना आपल्या शिक्षण पद्धतीवर बदल करून विद्यार्थ्यांना घडवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषद शाळेत मंजूर वर्गाचेच मुले शिक्षण घेतात.
– शीलवंत वानखडे, पालक, व्याळा.