मोठी बातमी ! राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना 689 कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव यांची माहिती
मुंबई : अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या नांदेड, परभणी, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसानीपोटी आर्थिक मदतीच्या माध्यमातून ६८९ कोटी ५२ लाख ६१ हजार रुपयांच्या निधीस राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याबाबतची माहिती मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बाधित शेतपिकांचे तात्काळ पंचनामे करण्यात आले. बाधित पिकांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकारने या मदतीच्या निधीस तत्काळ मंजुरी दिली. नैसर्गिक आपत्तीमध्ये दिलेल्या मदतीचा निधी शेतकऱ्यांच्या कर्ज अथवा अन्य वसुलीत वळती करू नयेत यासाठी संबधित जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून बँकांना निर्देश द्यावेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याचे जाधव-पाटील यांनी सांगितले.
हेदेखील वाचा : पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरसकट हेक्टरी 50 हजारांची मदत द्या; काँग्रेसची मागणी
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे ६ लाख ४८ हजार ५३३.२१ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. यासाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. परभणी जिल्ह्यात १ लाख ५१ हजार २२२.६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, त्यांना १२८ कोटी ५५ लाख ३८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही मदत
सातारा जिल्ह्यात २१.६० हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून शेतकऱ्यांना ३ लाख २३ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे. तर सांगली जिल्ह्यात ४ हजार ७४.२७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ७ कोटी ४५ लाख ३८ हजार रुपयांच्या मदतीस मान्यता देण्यात आली आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Rain News: अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे