सातारा : पालकांची मती गुंग करणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इयत्ता सातवीत शिकत असलेली मुलगी चार महिन्यांची गरोदर असल्याचे उघड झाले असून या गंभीर प्रकारास जबाबदार इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलाविरोधात शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सोनोग्राफी करताच प्रकार उघडकीस
संबधित मुलीची मासिक पाळी अनियमित येत असल्याने तिला तिच्या आईने तपासणीसाठी रुग्णालयात नेले. तिथे तिची सोनोग्राफी करताच हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. सातवीत शिकणाऱ्या या मुलीवर नववीत शिकत असलेल्या एका मुलाने सप्टेंबर महिन्यात गोड बोलून तिच्याच घरात तिच्यावर बलात्कार केला होता. हा प्रकार पीडित मुलीने कोणालाही सांगितला नव्हता.
दोघांची इन्स्टाग्रामवरून ओळख
मुलीच्या आईने मुलीला विश्वासात घेत विचारपूस केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पिडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याबाबत शाहुपुरी पोलीस ठाण्यात संबधित शाळकरी मुलावर पोक्सो कायद्या अंतर्गत, तसेच कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, त्याला रिमांड होममध्ये दाखल केले आहे. पीडित मुलीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.