कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का? 'हा' बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; पक्षप्रवेशाची तारीख...
काेल्हापूर/दीपक घाटगे : काँग्रेसचे दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांचे सुपुत्र आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी अखेर काँग्रेसचा ‘हात’ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश होणार असल्याचे निश्चित झाले असून, बुधवारी (दि. ३०) त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ‘देवगिरी’ बंगल्यावर भेट घेऊन पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केले आहे. काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे.
दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनानंतर राहुल पाटील यांच्या राजकीय भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल पाटील यांना बारामती येथे भेटीचे निमंत्रण दिले. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर, आपल्या मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार असल्याचे राहुल पाटील यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, त्यांनी गेल्या काही दिवसांत करवीर मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गटनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. भोगावती साखर कारखान्याचे संचालक आणि पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक असलेल्या शिलेदारांशी चर्चा करून त्यांनी राष्ट्रवादी प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.
‘देवगिरी’वर प्रवेशावर शिक्कामोर्तब
बुधवारी (दि. ३०) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. यावेळी राहुल पाटील यांच्यासह जिल्हा बॅकेचे संचालक राजेश पाटील सडोलीकर, गोकुळचे संचालक बाळासो खाडे, भोगावतीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव पाटील, गोकुळचे माजी संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, भोगावतीचे संचालक ए. डी. चौगले, बाजार समितीचे माजी सभापती भैय्या भुयेकर, बी. एच. पाटील, गणेश आडनाईक, चेतन पाटील उपस्थित होते.
पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का
विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसला गेल्या काही महिन्यात अनेक धक्के बसले असून पक्षातील नेते काँग्रेसला बाय-बाय करत आहेत. रवींद्र धंगेकर, संग्राम थोपटे यांच्यानंतर संजय जगताप यांनीही काँग्रेसला ‘रामराम’ ठोकला आहे. संजय जगताप यांनी भाजपत प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत संजय जगताप यांचा पुण्यातील सासवड येथे पक्षप्रवेश पार पडला. यावेळी अनेक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही भाजपत प्रवेश केला आहे. आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षात बदलाचे वारे वाहत असून सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याची जणू स्पर्धाच लागली आहे.