संग्रहित फोटो
बारामती : महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुलीला धमकी देत कारमध्ये बसवून निर्जनस्थळी नेत तिच्यावर कारमध्ये लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने शहर पोलीसांकडे फिर्याद दिली आहे. शारदानगर, माळेगाव येथे रस्त्याच्या बाजूला निर्जनस्थळी हा प्रकार घडला.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,याप्रकरणी अनिरुध्द उर्फ दादा भालचंद्र त्रिकुंडे (रा. चंद्रमणीनगर, बारामती) याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात शारिरिक शोषण, पॉक्सो, अनुसुचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडीतेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पिडीत मुलगी ही महाविद्यालयात येत असताना आरोपी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ येत असे. तेथे पिडीतेला बोलावून कारमध्ये बसवून सोबत घेवून जात होता. तसेच महाविद्यालय सुटल्यावर गेटवरूनच तो तिला कारमध्ये जबरदस्तीने बसवून निर्जनस्थळी नेत होता. तेथे तिला मारून टाकीन अशी धमकी देऊन कारमध्येच तिच्याशी जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बोपदेव घाटात सामूहिक अत्याचार
दोन दिवसांपूर्वी पुण्यातील बोपदेव घाटामध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. एक मित्र आणि त्याची मैत्रीण गुरुवारी रात्रीच्या सुमारास बोपदेव घाटावर फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथे तीन अज्ञात तरुण आले. त्या तिघं नरधमांनी फिरण्यासाठी आलेल्या त्या मुलाला आणि मुलीला धमकावलं. त्यांनी या मुलाला त्याचे कपडे काढून, त्याला शर्टने आणि बेल्टने झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर तिघांनी मुलीवर अत्याचार केले. या संपूर्ण घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं आहे.