वसई : खानावळीच्या पैशातून झालेल्या वादात सहकाऱ्याचा खून करुन पळून गेलेल्या कर्मचाऱ्याला गुजरात येथील जहाजातून अटक करण्याची कामगिरी नायगाव गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे.कामण येथील सेनरजी हायजील कंपनीत दिलीप सरोज आणि सुनिल प्रजापती हे दोघे काम करीत होते.या दोघांच्या खानावळी चे पैसे,मालक प्रकाश चामरिया यांनी सुनिल प्रजापती याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले होते.मात्र,प्रजापतीने सरोज ला त्याची रक्कम दिली नाही,त्यामुळे दोघांमध्ये वाद होवून प्रजापती ने सरोजवर प्राणघातक हल्ला केला.त्यात सरोजच्या डोक्याला,दोन्ही डोळयांवर आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली.
याप्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात ११८(२), ११५(२), ३५२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र,त्यानंतर सरोज यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.त्यामुळे याप्रकरणी १०३(१) अशी कलमे वाढवण्यात आली.दरम्यान आरोपी प्रजापती फरार झाला होता.
या गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांचे दोन वेगवेगळे पथके बनवून प्रजापतीचा शोध घेतला जात होता.तपासादरम्यान प्रजापती हा ओका,व्दारका बंदर,गुजरात येथील जहाजात आपले अस्तित्व लपवून रहात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती.त्यानुसार गुन्हे शाखेने ओका बंदरालगत असलेली २०० हून अधिक जहाजांची तपासणी करुन सुनील प्रजापतीला अटक केली.
वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश केकान,उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे,अनिल मोरे,सहाय्यक फौजदार बाबाजी चव्हाण, हवालदार शेखर पवार,सचिन ओलेकर,सचिन मोहीते,सचिन खंताळ,जयवंत खंडवी,अमर पवार,चेतन ठाकरे,अशोक पाटील,पांडुरंग महाले,बाळासाहेब भालेराव,अमोल बरडे यांनी ही कामगिरी केली.