मुंबई : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षाचे शिष्टमंडळ नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांच्या भेटीला रवाना झाले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह ठाकरे गटातील नेतेमंडळींचा समावेश आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या जागी रमेश बैस यांची निवड केंद्र सरकारकडून करण्यात आली. काही दिवसांपूर्वी त्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. सध्या ते राज्यपाल पदावर असल्याने विरोधी पक्षातील नेत्यांचे शिष्टमंडळ पहिल्यांदाच त्यांच्या भेटीला गेले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार जितेंद्र आव्हाड, अनिल परब यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. ही भेट कोणत्याही राजकीय विषयावर नाही तर सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे.
रमेश बैस नवनिर्वाचित राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर झाल्याने, त्यांच्या जागी रमेश बैस यांनी राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. यापूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विरोधकांनी मोठे आंदोलन केले होते. त्यानंतर काही दिवसांच्या प्रतिक्षेनंतर त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. रमेश बैस यांनी झारखंडच्या राज्यपाल पदाचा कार्यभार सांभाळला आहे.