आंबिवली गावामधील घराला भीषण आग, घरातील सर्व साहित्य जळून खाक
कर्जत/संतोष पेरणे : कर्जत तालुक्यातील माणगाव तर्फे वरेडी ग्रामपंचायत मधील आंबिवली गावातील एका शेतकऱ्याचे घर आगीत भस्मसात झाले.घराला आग लागले त्यावेळी घरात कोणीही व्यक्ती नसल्याने जीवितहानी झाली नाही,मात्र घराचे १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे.
कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत माणगांव तर्फे वरेडी हद्दीतील आंबिवली गावाचे प्रवेशद्वारावर असलेले जगदीश कराळे यांच्या घराला पहाटे भीषण आग लागली होती.पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास ही आग लागली आणि त्यावेळी जगदीश कराळे यांच्या घरामध्ये कोणीही व्यक्ती नव्हते. राहत्या घराला आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. मात्र ही आग विझवण्यासाठी आंबिवली गावातील स्थानिक नागरिकांनी तत्काळ तत्परता दाखवत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला.परंतु ही आग इतकी भयंकर होती की या आगीमध्ये घरातील सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत तसेच या आगीच्या ज्वालांमध्ये घराचे पत्रे देखील फुटले आहेत.
रात्रीच्या वेळी गाव झोपेत असताना लागलेल्या आगीमध्ये जगदीश कराळे यांच्या घराचे खूप मोठे नुकसान झाले आहे.घरात असलेले सर्व फर्निचर,कपडे,धान्य अन्य साहित्य,इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच अन्य साहित्य असे सर्वच साहित्य जळून खाक झाले.तर घराच्या छपरावरील सर्व सिमेंट पत्रे देखील जळून जमिनीवर पडली एवढ्या मोठे प्रमाणावर नुकसान झाले.या घटनेची माहिती मिळताच गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा वापर करून आग विझवण्याचा प्रयत्न केला.मात्र आगीने घेतलेले रूप यामुळे घर क्षणात जळून भस्मसात झाले आणि १०० टक्के नुकसान या आगीमध्ये झाले आहे.
या सर्व घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली,मात्र आगीचे कारण कळू शकले नसते तरी या आगीमध्ये घरातील किंमती साहित्य जळून खाक होत असताना कोणीही व्यक्ती घरात नसल्याने जीवितहानी झाली नाही.
तर दुसरीकडे कर्जतमध्ये कुणबी जातीचा ओबीसी मध्ये समावेश असल्याने कर्जत तालुक्यात खाडाखोड करून कुणबी नोंदी घातल्या जात आहेत.त्या नोंदींना कर्जत तालुका ओबीसी समाज संघटना महासंघ यांनी निवेदनाद्वारे विरोध केला. ओबीसी समाज संघटना महासंघ यांच्या माध्यमातून आज कर्जत तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांना निवेदन देवून आक्षेप नोंदवला असून ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काढण्यात आलेले जीआर रद्द करावा अशा मागण्या केल्या आहेत.