स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला (फोटो - सोशल मीडिया)
Meenatai Thackeray statue Red Colour : मुंबई : राज्याच्या राजकारणामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. नेत्यांचे एकमेकांवर जोरदार आरोप सुरु असताना मुंबईमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांचे श्रद्धास्थान असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर हा प्रकार झाल्यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
दादर येथील शिवाजी पार्क येथे स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांचा अर्धाकृती पुतळा आहे. त्यांच्या या पुतळ्यावर अज्ञात व्यक्तीकडून लाल रंग टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काल (दि.16) रात्री हा प्रयत्न करण्यात आला असून यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, या संतप्तजनक प्रकारानंतर ठाकरे गटाकडून पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र घडलेल्या या प्रकारामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. पुतळ्यावर लाल रंग टाकणाऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. यासाठी घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले जात आहे. सीसीटीव्हीवरुन आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मीनाताई ठाकरे या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री आहेत. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे. सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांना यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. त्यामध्ये एक व्यक्ती दिसत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. मात्र या घटनेमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. घटनास्थळी शिवसैनिकांनी जमण्यास सुरुवात केली आहे. पुतळ्याच्या जवळपास असणारा लाल रंगाची सफाई करण्याचे काम याठिकाणी सुरु आहे. तसेच पोलीस देखील दाखल झाले असून गर्दी कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातो आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती
याबाबत खासदार अनिल देसाई यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देत राग व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, “कुणीतरी रंग फेकण्याचा प्रयत्न केला आहे. या समाजकंटक किंवा भेकडांच्या औलादीला कोणती संस्कृती, कोणते संस्कार झालेले नसतील. यांचा पोलिसांतर्फे शोध घेतला जात आहे. जे व्हायचं ते होईल, अशा प्रवृत्तींना पोलीस किंवा सरकारी यंत्रणा काय, आज तुमचे जे काही कर्तव्य आहे, ते नेमकं त्यावर काय चाललंय का, याचा निषेध करण्यापलीकडील या गोष्टी आहेत आणि त्यामुळे सरकार अपयशी ठरलं हे आपल्या प्रत्येक वेळी जाणवत आहे,” असा आक्रमक पवित्रा अनिल देसाई यांनी घेतला आहे.