पुणे : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असतानाच हडपसरमधील एकाच गृहप्रकल्पातील चार फ्लॅट चोरट्यांनी फोडले आहेत. दोन फ्लॅटमधून ६८ हजारांचा ऐवज चोरून नेला असून, दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात अभिजीत उमरेडकर (वय ४०) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हा प्रकार १४ ते १७ सप्टेंबर या कालावधीत घडला आहे. तक्रारदार हे फुरसुंगीमधील सासवड रोडवरील ग्रीन क्रेस्ट या बहुमजली इमारतीत राहतात. त्यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांनी २१ हजांराचा ऐवज नेला आहे. तर, नविनकुमार सिन्हा यांच्या फ्लॅटमधून दागिने व रोकड असा ४७ हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. तर, त्यांच्याच प्रकल्पातील सी विंगमधील दोन फ्लॅट फोडून चोरीचा प्रयत्न केला आहे.
[read_also content=”बहिण बेपत्ता झाली; संशयावरून मालकाला बेल्टने मारहाण https://www.navarashtra.com/maharashtra/sister-went-missing-the-owner-was-beaten-with-a-belt-on-suspicion-nrdm-327379.html”]
त्यासोबतच टिंगरेनगरमधील बंद फ्लॅट भरिदवसा फोडून चोरट्यांनी ६७ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात राहुल पवार (वय २६) यांनी तक्रार दिली आहे. तक्रारदार हे दोन दिवसांपुर्वी सकाळी ९ च्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. तसेच, कपाटात ठेवलेले ६७ हजारांचे दागिने चोरून नेले. तक्रारदार हे सायंकाळी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. पुढील तपास पोलीस करत आहेत.






