(फोटो-istockphoto )
भांडुप : भांडुप येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आला. आई अभ्यासावरून ओरडत असल्याने भांडुप परिसरात राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीने स्वतःच्या अपहरणाचा आणि अत्याचाराचा बनाव रचला. या मुलीच्या सांगण्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पण, नंतर तिची अधिक चौकशी केली असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे समोर आले.
हेदेखील वाचा : महाज्योत, रॅली अन् विद्यार्थ्यांचा उत्साह, नवभारत महाराष्ट्राची महासमृद्धी व सामाजिक उत्कर्ष संमेलन 5 ऑक्टोबरला
भांडुप पोलिसांनी यामध्ये मुलीच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करत तपास देखील सुरू केला होता. मात्र, यामध्ये काहीही पुरावे मिळून येत नसल्याने या मुलीकडेच पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तिने बनाव केल्याचे कबूल केले आहे. भांडुप परिसरात ही 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहत असून, ती सध्या दहावी इयत्तेत शिकते. शनिवारी नेहमीप्रमाणे सकाळी सातच्या सुमारास ती शाळेत गेली होती. मात्र, दुपार झाल्यानंतर देखील ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी बराच वेळ तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही.
अखेर कुटुंबीयांनी भांडुप पोलीस ठाण्यात जाऊन ती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलीस तिचा शोध घेत असतानाच सायंकाळी सहाच्या सुमारास ती घरी परतली. यावेळी तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता, आईच्या ओरड्यापासून वाचण्यासाठी तिने अपहरणाचा बनाव रचला.
शाळेत जाताना अपहरण?
सकाळी शाळेत जात असताना तिघांनी आपले अपहरण करत ठाणे परिसरात नेले. त्याठिकाणी एका बंद खोलीत आपल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचे तिने सांगितले.
कुठलाही धागादोरा सापडला नाही
मुलीने सांगितलेल्या परिसरात जाऊन पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेतले. मात्र, यामध्ये मुलगी अनेक ठिकाणी एकटीच फिरताना दिसून आली. तिने सांगितल्याप्रमाणे कुठलाही धागादोरा पोलिसांना मिळून येत नव्हता. त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय आल्याने त्यांनी तिची चौकशी केली असता, तिने पोलिसांना असे काहीच घडले नसल्याचे सांगितले.
हेदेखील वाचा : राज्यातील पहिला ‘ॲक्वाफेस्ट’ जल पर्यटनमहोत्सव जळगावमध्ये सुरु! पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महोत्सवाचे उद्घाटन