मतदानाच्या दिवशी पुणे शहरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल 'इतके' कर्मचारी असणार तैनात
पुणे : विधानसभेच्या मतदानादिवशी (२० नोव्हेंबर) शहरात पुणे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. मतदान केंद्र व शहराचा गेली दोन दिवस आढावा घेऊन हा बंदोबस्त आखला गेला आहे. बंदोबस्तासाठी ११ पोलीस उपायुक्त, २२ सहायक आयुक्ता, ६४ पोलीस निरीक्षक, ३११ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षकांसह ५ हजार २५५ पोलीस कर्मचारी आणि १८७० होमगार्ड तैनात असणार आहेत. यासोबतच बाँम्ब शोधक नाशक पथक, शीघ्र कृती दल आणि क्रेंदीय निमलष्करी सशस्त्र दल कार्यरत असणार आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त आखला गेला आहे. आचार संहिता लागल्यापासून पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास सुरवात केली होती. मतदानाच्या अनुषंगाने बंदोबस्ताची तयारी सुरु केली आहे. शहरात 716 इमारतींमध्ये मतदान केंद्रे असणार आहेत. त्यांची विभागणी 168 सेक्टरमध्ये करण्यात आली आहे. तेथे सहायक निरीक्षक किंवा उपनिरीक्षक असतील. या केंद्रांवर कॉल मिळताच दोन मिनिटांत गस्ती पथकाची वाहने पोचहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासोबत 31 ठिकाणीही नाकाबंदी करण्यात येणार आहे. पोलीस उपायुक्त आणि सहायक आयुक्तांची फिरती पथके असणार आहेत. तसेच सीसीटीव्हीव्दारे लक्षही ठेवले जाणार आहे. गुन्हे शाखेची 40 पथके त्यामध्ये 300 कर्मचारी गोपनीयरित्या कार्यरत असणार आहेत. तसेच पोलिसांच्या दृष्टीने संवेदशिल असलेल्या ७४ इमारतीवर विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
हे सुद्धा वाचा : शरद पवार यांचा मोठ्या नेत्याला इशारा; म्हणाले, माझ्यासोबत या, नाहीतर…
रात्री पोलिसांची विशेष गस्त
मतदारांना मतदानाच्या दोन दिवस अगोदर आमिष दाखवले जाते, तसेच पैशांचा वाटपही केला जातो. ही बाब लक्षात घेऊन पोलिसांनी रात्रीची विशेष गस्त आज पासून कार्यरत केली आहेत. तसेच सकाळचीही गस्त असणार आहे. वारजे, संगमवाडी, नागपुर चाळ, जनता वसाहत , नाना पेठ अशा संवेदनशिल ठिकाणी विशेष लक्ष ठेवले जाणार आहे.
पुणे जिल्ह्यातही कडेकोट पोलीस बंदोबस्त
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही मतदानाच्या दिवशी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बंदोबस्ताची कडेकोट आखणी केली आहे. बंदोबस्तात एक पोलीस अधीक्षक, दोन अपर पोलीस अधीक्षक, 9 उपविभागीय पोलीस अधिकारी, 35 पोलीस निरीक्षक, 287 पोलीस उपनिरीक्षक, 3 हजार 246 पोलीस अंमलदार, 2 हजार 600 होमगार्ड, केंद्रीय दलाच्या 11 कंपनी, राज्य राखीव पोलीस दलाची एक कंपनी तैनात करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
मतदान प्रक्रीया शांततेत, निर्विघ्न, भयमुक्त वातावरणात पार पडावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांचा व स्ट्राँग रूमचे सुरक्षेचा आढावा विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्यासह पोलीस अधीक्षक देशमुख यांनी घेतला आहे. मतदान केंद्र परिसरासह ग्रामीण हद्दीत गस्तीसाठी पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरीकांनी निर्भिडपणे, भयमुक्त होऊन मतदानासाठी बाहेर पडून मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
पहा एका दृष्टीक्षेपात पोलिस बंदोबस्त
डीसीपी-11, एसीपी- 22, पोलीस निरीक्षक-64, एपीआय/पीएसआय -311, पोलीस अमलार-5 हजार 255, होमगार्ड- 1 हजार 870, सशस्त्र केंदीय दले- 15, एसआरपीएफ कंपनी -2
शहरातील 716 इमारतीमध्ये 3 हजार 331 बूथ आहेत तर 58 इमारतीमध्ये 10 पेक्षा जास्त बूथ आहेत. त्यापैकी 1 संवेदनशील बूथ आहे. तर 74 पोलीस संवेदनशील इमारती आहेत. हे सर्व 138 सेक्टरमध्ये विभागणी केली आहे. तसेचे दोन ते तीन मिनिटांत पेट्रोलिंग व्हॅन पोहचू शकते असे नियोजन केले आहे. गुन्हे शाखा 40 टीम कार्यरत असून, त्यामध्ये 300 कर्मचारी तैनात आहेत. क्यूआरटी आणि घातपात पथके प्रत्येकी 6 पथक कार्यरत आहेत.