पिंपरी : नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमजवळील भंगार साहित्याच्या गोदामाला (स्क्रॅप यार्ड) आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अवघ्या काही वेळातच ही आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
अग्निशमन विभागाच्या मुख्य नियंत्रण कक्षाला गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच दहा वाहनांसह पथक घटनास्थळी दाखल झाले. स्क्रॅप यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर लाकूड, प्लास्टिक आणि इतर ज्वलनशील वस्तू साठविलेल्या असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व दिशांनी पाण्याचे फवारे मारत समन्वय साधून आगीवर नियंत्रण मिळवले.
अग्निशमन दलाच्या वेळेवर आणि तातडीच्या प्रतिसादामुळे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान तसेच संभाव्य जीवितहानी टळली. आग विझवण्याच्या कामात जवळपास दोन तासांपर्यंत जवान गुंतले होते. सध्या आगीचे कारण स्पष्ट झालेले नसून, प्राथमिक पाहणीत शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी आपल्या परिसरात अनावश्यक स्क्रॅप, प्लास्टिक, लाकूड आणि ज्वलनशील वस्तू टेरेस, बाल्कनी, पार्किंग किंवा बेसमेंटमध्ये साठवू नयेत, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केले आहे. अशा वस्तूंची योग्य विल्हेवाट लावल्यास आग लागण्याच्या घटनांना आळा बसू शकतो, असेही सांगण्यात आले.
गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्परतेने प्रतिसाद देत अवघ्या काही वेळात आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. नागरिकांनी अशा आगीच्या घटनांबाबत तातडीने अग्निशमन विभागाशी संपर्क साधावा, जेणेकरून मोठी दुर्घटना टाळता येईल.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
नेहरूनगर येथील आगीच्या घटनेत आमच्या अग्निशामक जवानांनी अत्यंत धैर्य दाखवून आग वेळेत नियंत्रणात आणली. स्क्रॅप यार्डमध्ये आग झपाट्याने पसरत होती, परंतु टीमच्या प्रशिक्षण आणि तत्परतेमुळे मोठी हानी टळली.
– उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका
आम्ही आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो. यार्डमध्ये लाकूड आणि प्लास्टिक असल्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. मात्र, सर्व पथकांनी एकत्रित समन्वय साधत पाण्याचे फवारे मारून आग नियंत्रणात आणली आणि ती पूर्णपणे विझवण्यात यश मिळवले.
– ऋषिकांत चिपाडे, उप अग्निशमन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका